पंतप्रधान मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचे सांगितले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर चार डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या दौऱ्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता होती. मात्र हे 100 देशांचे राजदूत 4 डिसेंबर रोजी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

कोरोना प्रतिबंधक लस कधी येईल हे आपल्या हातात नाही. लस कधी येणार हे संशोधकांच्या हाती आहे. त्यामुळं या मुद्द्यावरुन राजकारण करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लशी अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.