निवडणूक निरिक्षकांनी घेतला निवडणूकीचा आढावा

0

संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे

वेबकॉस्टींग करण्याचे निवडणूक निरिक्षकांचे निर्देश

जळगाव, :- विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे वेबकॉस्टींग करण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरिक्षकांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरिक्षक आज जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आज विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेऊन काही महत्वपूर्ण सुचना केल्यात.

याप्रसंगी चोपडा व रावेरचे निवडणूक निरिक्षक नरेंद्रसिंग पटेल, भूसावळ व जळगाव शहरचे रुपक मुजूमदार, जळगाव ग्रामीण व अमळनेरचे पुनीत गोयल, एरंडोल व चाळीसगावचे पार्थ सारथी मिश्रा, पाचोरा, जामनेर व मुक्ताईनगरचे निवडणूक निरिक्षक गौरव बोथरा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेसह सर्व नोडल अधिकारी व निवडणूक निरिक्षकांचे संपर्क अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी निवडणूक निरिक्षक यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी त्याचबरोबर दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी अथवा सवलत देण्याचे निर्देश सर्व खाजगी आस्थापनांना देण्यात यावे. मतदान प्रक्रियेत कुठलीही अडचण उद्भवू नये याकरीता सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. सेक्टर ऑफिसर सोबत मास्टर ट्रेनर अथवा ईव्हीएम एक्सपर्ट ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता त्यांचेकडून मतदानाचा फॉर्म भरुन घ्यावा. जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्रावर नेटवर्क उपलब्ध नाही. तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. सर्व मतदान केंद्र हे तळमजल्यावर असल्याची खात्री करण्याबरोबरच खाजगी जागेतील मतदान केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करावे. पेडन्युजवर बारकाईने लक्ष ठेवावे. सर्व्हीस वोटरला विहित वेळेत मतपत्रिका पाठविण्याची व्यवस्था करावी.

तसेच जिल्ह्यातील परवानाधारकांकडून शस्त्रात्रे जमा करावीत. प्रत्येक उमेदवाराच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवावे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच जिल्ह्यात नेमण्यात आलेले फ्लाईग स्कॉड, व्हीडीओ सर्व्हिलन्स टीम, स्थिर निगराणी पथके यांनी वाहनांची तपासणी करावी. निवडणूक यंत्रणेने उमेदवारांच्या सभा, बैठकांची माहिती घेऊन त्यानुसार पथकांची नेमणूक करावी. विना परवानगी कुठलीही सभा, बैठका होणार नाही याची दक्षता निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच प्रचाराच्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सुचनांही त्यांनी यावेळी केल्यात.

तत्पूर्वी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी निवडणूक निरिक्षकांना जिल्ह्यातील कृषि, उद्योग, पर्यटन, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय घडामोडींच्या संक्षिप्त माहितीसोबतच जिल्हा प्रशासनाने निवडणूकसाठी केलेल्या तयारीची तर पोलीस अधिक्षक डॉ. उगले यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने संवेदनशील मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्त, चेकपोस्ट, अवैध दारु वाहतुक रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती निवडणूक निरिक्षकांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.