निर्भया प्रकरणातील चारही दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर

0

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील चारही दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पुढील आदेशापर्यंत या चौघांना फाशी देण्यात येऊ नये, असे दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टाने स्पष्ट केले असल्याने उद्या (१ फेब्रुवारी) सकाळी सहा वाजता या चौघांना होणारी फाशी टळली आहे.

पतियाळा हाउस कोर्टाने निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीसाठी काढण्यात आलेल्या ‘डेथ वॉरंट’वर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे फाशी दुसऱ्यांदा लांबणीवर गेली आहे. याआधी २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्याचे निश्चित झाले होते. मात्र तेव्हाही फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

पतियाळा हाउस कोर्टात तिहार कारागृहाच्या वतीने इरफान अहमद यांनी बाजू मांडली. विनय शर्माची दया याचिका अद्याप प्रलंबित असून अन्य तीन दोषींना उद्या फाशी देणे शक्य आहे, असे अहमद यांनी नमूद केले. यात काहीही बेकायदेशीर ठरणार नाही. मुकेश या आरोपीची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्याच्यापाशी आता कोणताही कायदेशीर पर्याय उरलेला नाही, असे अहमद यांनी सांगितले. त्याचवेळी अक्षय या आरोपीच्या वकिलांनी हस्तक्षेप करत आमची क्युरेटिव्ह याचिका फेटाळण्यात आली असली तरी आम्हाला दया याचिका करायची आहे, असे नमूद केले. दोषींकडे अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचे वकिलांकडून कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर कोर्टाने पुढील आदेशापर्यंत डेथ वॉरंट’ला स्थगिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.