नाफेडचा 5 लाखाचा हरभरा चोरी प्रकरण; पोलिसांची संशयास्पद भूमिका

0

खामगाव, गणेश भेरडे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरालगतच्या वरखेड खुर्द शिवारातील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदाम मधून सुमारे 5 लाखाचा हरभरा चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी काल 4 जानेवारी रोजी दोघांना ताब्यात घेऊन चोरी गेलला माल व वाहनासह सुमारे साडे अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. मात्र या चोरट्यांकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्या खाजगी जय किसान कृउबास विरूध्द कोणतीही कारवाई न करता पाठराखण केल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून कारवाई करावी जेणेकरून शेतमालाच्या चोरीला आळा बसेल अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र वखार महामंडळ (वरखेड खुर्द) येथुन 1 ते 2 डिसेंबर2021 दरम्यान 175 कट्टे प्रत्येकी असा एकुण 87 क्विटल 50 किलो प्रती क्विटल रुपये 5610/- रुपये प्रमाणे एकुण 4,90,875/- रुपयाचा नाफेड ने खरेदी केलेला हरभरा चोरुन नेला. याप्रकरणी झालेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस स्टेशनला भादंवि कलम 461, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान प्राप्त सिसिटीव्ही फुटेज, गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक तपासणीच्या आधारे अत्यंत शिताफीने तपास करुन पोलिसांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटे विठ्ठल पंजाबराव मेहंगे रा. आनंदसागर रोड, शेगाव व विशाल गजानन भटकर रा. रोकडीया नगर, शेगाव या दोघांना ताब्यात घेवून सखोल व बारकाईने विचारपुस केली असता नमुद आरोपीने सदरचा गुन्हा केला असुन गुन्ह्यातील चोरलेला माल खामगाव येथील खाजगी जय किसान कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विक्री केल्याचे सांगितले.

त्यामुळे तेथुन गुन्ह्यातील चोरी गेलेला नाफेडचा हरभरा 87 क्विंटल 50 किलो किंमती 4,90,875 रू. तसेच गुन्ह्यात वापरलेले एक टाटा 709 क्रमांक एम.एच. -04 – 2284 वाहन किंमत 6,50,000/- रुपये, आरोपीतांचे दोन व्हिवो कंपनीचे मोबाईल किंमती 14,000/- असा एकुण 11,54,875/- रुपयाचा मुद्येमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि.पंकज सपकाळे व डिबी पथक करीत आहे. सदर आरोपीतांकडुन जिल्ह्यातील गोडावून फोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता सुध्दा आहे. असेही प्रेसनोट मध्ये नमूद केले आहे.

एरव्ही सराफा पासून भंगार व्यवसायिकांपर्यंत चोरीचा माल विकत घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. मात्र या प्रकरणात खाजगी जयकिसान कृउबास वर कोणती कारवाई झाली, याबाबत जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत होती. त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने शहर पो.स्टे. ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास अधिकारी पीएसआय सपकाळे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. तर सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधितांनी सरकारी हमी भावाने माल विकल घेतला आहे. उलट त्यांचेच नुकसान झाले आहे. मात्र कोणत्या व्यापाऱ्याला चोरट्यांनी विकला हे सांगू शकत नाही, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. खाजगी बाजार समितीत इतर कोण व्यापारी माल विकत घेणार असा प्रश्‍न उपस्थित होत असल्याने पोलिसांची संशयास्पद भूमिका अधिक गडद होत असल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या कृउबास मध्ये जर असा चोरीचा शेतमाल कोण्या अडते, व्यापारी यांनी विकत घेतला असते तर त्यांच्याविरूध्द कारवाई झाली असती, अशा कारवाया यापुर्वी झालेल्या आहेत. हा तर नाफेडचा माल आहे, अशी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर एका अडत्याने दिली. तर कृउबास मध्ये माल विकणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा, पेरेपत्रक मागण्यात येते मग तो माल व्यापाऱ्याचा का असोना, पण खाजगी बाजार समिती मध्ये अशी व्यवस्था नसल्याने चोरीचा शेतमाल विकण्याची सोय झालेली आहे. त्यामुळेच पंजाबसह इतर राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे 2 वर्ष दिल्लीत आंदोलन करून अखेर मोदी सरकारला काळे कृषि कायदे मागे घेण्यास भाग पाडले, अशी तिखट प्रतिक्रियाही एका शेतकऱ्याने दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.