नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण ; जाणून नवा दर

0

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी  दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 20 रुपयांनी आणि चांदीचे दर 404 रुपयांनी कमी झाले आहेत. दरातील घसरणीसह या आठवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा 49 हजार 678 रुपये आणि चांदीचे दर 67 हजार 520 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. HDFC सिक्युरिटीने ही माहिती दिली.

31 डिसेंबर 2020 रोजी सराफा बाजारात सोन्याचे दर 49 हजार 698 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 67 हजार 924 रुपये प्रति किलोग्रॅम होते. कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात सुरुवातीला किरकोळ वाढ दिसली. MCX वर फेब्रुवारीत डिलिव्हर होणारं सोनं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 84 रुपयांनी महागलं. या दिवशी बाजार 50 हजार 235 रुपये दरासह बंद झाला. एप्रिलमध्ये डिलिव्हर होणाऱ्या सोन्याच्या दरात 136 रुपयांच्या वाढीसह 50 हजार 319 रुपये इतका दर झाला.

MCX वर चांदीचे दर काय?

चांदीबाबतही दरांमध्ये काहीशी वाढच होताना दिसली. MCX वर मार्चमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या दरात 15 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचे दर 68 हजार 120 रुपयांवर पोहचले. मात्र, मे महिन्यात डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या दरात 18 रुपयांची घट झाली. यासह चांदीचे दर 69 हजार 50 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झालेली पाहायला मिळाली. सोन्याचे दर 1900 डॉलरवर पोहचले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी फेब्रुवारीत डिलिव्हर होणारं सोनं 0.10 डॉलरच्या वाढीसह 1901.60 डॉलर प्रति आऊंसवर पोहचलं. मार्चमध्ये बाजारात येणाऱ्या चांदीचे दर डॉलरच्या घटीसह 26.52 डॉलर प्रति आऊंसवर पोहचले आहेत.

मागील वर्षी सोन्यावर 30 टक्के परतावा

2020 मध्ये सोन्यावर जवळपास 30 टक्क्यांचा शानदार परतावा मिळाला होता. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या मनात यंदाच्या परताव्याबाबतही काही ठोकताळे आहेत. कमोडिटी मार्केटच्या तज्ज्ञांनुसार, नव्या स्टिमुलस पॅकेजची शक्यता लक्षात घेता यंदा सोन्याच्या दरात वाढ होईल. यावर्षी बाजारात सोने अगदी सहजपणे 60 हजाराचा टप्पा पार करेल. 2021 मध्ये सोन्याचे दर (Gold rate India) 63 हजार रुपये प्रति तोळा इथपर्यंत जाईल, असंही त्यांचं म्हणणं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.