नतमस्तक होवून गाऊ आम्ही तुझ्या प्रतिभेचे गुणगान

0

बहुरुपी पुलत हशा आणि टाळ्यांसह भारावले रसिक!

जळगाव दि. 13-
पुलंच्या जन्मशताब्दी निमित्त विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित शेवटच्या दिवशी पुणेरी कलावंतांकडून सादर झालेल्या बहुरुपी पु.ल. या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध झाले. दोन तास चाललेल्या या सादरीकरणात हशा आणि टाळ्यांसह नतमस्तक होवून गाऊ आम्ही तुझ्या प्रतिभेचे गुणगान या शेवटाने व्याकूळ रसिक अक्षरश: भारावले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षा हेमा अमळकर व रत्नाकर गोरे केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलश्री सहजे यांनी केले. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर, आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्त जिल्हास्तरीय पुलोत्सवाच्या रविवारी शेवटच्या दिवशी पुणे येथील कलावंतांकडून बहुरुपी पुल हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात पुलंनी लिहिलेली अनेक पात्रे पुलंचा स्पर्श झालेली अनेक नाटक, अभिवाचन, नृत्य, संगीत, गाणे, चित्रफित आदी माध्यमाद्वारे कलावंतांनी जीवंत केली.
चाळ नावाच्या वाचाळ वस्तीसह पात्रे भावली
ना. मा. बटाटे यांनी बांधलेल्या बटाट्याच्या चाळीत प्रेमाचा ओलावा अद्याप टीकून आहे. सध्याच्या सोसायट्यांमध्ये कायम घराची दारे बंद असतात. चाळ नावाच्या वाचाळ वस्तीची दारे कायम उघडी असायची. घरात कढीचा मारलेला झुरका हा व्हरांड्यात ऐकू यायचा आता मात्र सर्व लपवाछपवी आहे. जेवतील तेही दार बंद करुन. चाळीला या चोरट्या जगण्याची काळजी वाटत असल्याचे मत सुनिता देशपांडे (शिवानी सोनार) यांनी व्यक्त केले. या व्यतिरिक्त नाथा कामत, बापू काळे, व्हेनीस येथील प्रसंग, ग्रामीण जीवन त्यातील थिएटर आदींनी रंगत आणली.
कवितेच्या धाग्याने जीवन फुलले
पु.ल. देशपांडे व सुनिताबाई यांच्या रजिस्टर लग्नाचा प्रसंग, वंदे मातरम् चित्रपटात गदिमांनी दोघांना दिलेली संधी, त्यांचा 55 वर्षांचा सहप्रवास उलगडला. दोघांमध्ये कवितेचा समान धागा असल्याने त्यांचा संसार टिकला, असे पुलंनी म्हटले आहे.
संपुर्ण गैरसमजावर लग्न टिकते
पुलंचा भाचा अशोकचे लग्न ठरले. त्याला नववधू डॉ. कोमलसह संसाराच्या टीप्स देताना लिहिलेले पत्रात संपुर्ण गैरसमजावर लग्न टिकत असते असा उपदेश पुलंनी केला. ती डॉक्टर असल्यामुळे तू प्रकृतीची काळजी घेत नाही हा तीचा समज कायम ठेव, स्वयंपाकावर सौचे मत ग्राह्य धरावे, सौच्या नातेवाईकांना बोलू नये, तिचा वाढदिवस विसरू नये आदी उपदेश केला.
गदिमा, गडकरी, खांडेकर आदींनी
समृद्ध केले
काहीही माहित नसलेल्या वॉलपॉलवर शाळेत निबंध लिहिल्यावर आपण लेखक होऊ शकतो, असे वाटू लागले. प्र.के. अत्रेंसारखे प्रतिथयश लेखक असताना माझी चर्चा होवू लागली व 1943 मध्ये पुरुषोत्तम अवतार प्रकटला. त्याचप्रमाणे ग.दि. माडगूळकर, राम गणेश गडकरी, वि.स. खांडेकर, प्र. के. अत्रे आदींच्या संस्कारांनी आपणास समृद्ध केल्याचे पुलंनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे रविंद्रनाथांच्या शांतीनिकेतनमधील तीन महिन्यांतील संस्कार आदी उलगडून दाखविले. पुलंनी काम केलेल्या जोहार मायबाप जोहार गाणे, इंद्रायणी काठी पं. भिमसेन जोशींनी गायिलेला अभंग व कथाकथनाची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली.
शो मस्ट गो ऑन, गेम स्पिरीट
बहुरुपी पुल हा पुण्याच्या कलावंतांच्या कार्यक्रमात मुख्य कलाकार विजय पटवर्धन, प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन हे तांत्रीक अडचणीमुळे येवू शकले नाहीत. मात्र तरीही न डगमगता 24 तासातच निर्मात्या रुचा केळकर, लेखक दिग्दर्शक पराग बापट, हेमंत शिर्केे, निलेश घारे, अनिरुद्ध देवकर, शिवानी सोनार यांनी त्यांची उणीव भासू न देता कार्यक्रमाचा दर्जा कायम राखत शेवटपर्यंत रसिकांना खिळवून ठेवले.

Leave A Reply

Your email address will not be published.