दिवाळी : प्रकाशपर्वाला आजपासून प्रारंभ

0

जळगाव;- दीपोत्सवाला आज दि. 9 नोव्हेंबर रोजी वसूबारसपासून सुरुवात होत असल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. दीपोत्सवामुळे बाजारपेठ, सराफ बाजार सजला आहे.

मंदिरे आणि रस्त्यांवर रोषणाई करण्यात आली असून, घरोघरी लागलेल्या आकाशकंदिलांनी शहर उजळले आहे.

दीपोत्सवात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.

दीपोत्सवाला दि. 9 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. आज वसुबारस अर्थात गोवत्स बारस आहे. आजची तिथी नक्षत्र आश्विन कृष्ण द्वादशी किंवा गोवत्स द्वादशी असही आजच या सणाला म्हणतात. दीपावली या सर्वात मोठ्या सणाचा आजचा पहिला दिवस हा गोमाता व तिचे वासरू यांच्या पूजनाने साजरा केला जातो.. भारत हा कृषिप्रधान देश आहे व हिंदू संस्कृती मध्ये गाईला गोमाता असे संबोधले जाते

या उत्सवात लक्ष्मीपूजनाला सर्वाधिक महत्व आहे. या दिवशी व्यापारी वहीपूजन करतात तर घरोघरी लक्ष्मी मातेची आराधना केली जाते. लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा देखील करण्यात येते. यासाठी बाजारपेठेत मूर्ती विक्रीस आल्या आहेत. मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती शंभर रुपयांपासून ते तीन हजार 500 रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. सहा इंचापासून ते दीड फूटापर्यंत मूर्ती विक्रीस आल्या आहेत. यंदा मूर्तींच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. तर वहीपूजनासाठी लागणार्‍या वह्या व इतर साहित्य विक्रेत्यांनीही तात्पुरते दुकाने थाटली आहेत.

दीपोत्सवात आकाश कंदीलला महत्व आहे. घरोघरी आकाश कंदील लावले जातात. बाजारात कागदाच्या विविध आकार, प्रकारातील आकाश कंदील विक्रीस आल्या आहेत. 150 रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आकाश कंदील बाजारात उपलब्ध आहेत.

दीपोत्सवात अंगणात पणत्या लावल्या जातात. बाजारात चकाकणारी चमकी, टिकल्या, घुंगरु, काच यासारख्या सजावटीच्या वस्तू वापरुन सजवण्यात आलेल्या पणत्या विक्रीस आल्या आहेत. बदाम, पानफुल, चौकोणी, गोलाकार, षटकोनी, मोर, हत्ती, तुळशी वृदांवन अशा विविध आकारातील पणत्या लक्षवेधून घेत आहेत. 50 रुपयांपासून 300 रुपये डझनपर्यंतच्या पणत्या विक्रीस आल्या आहेत.

दिवाळीतील महत्त्वाचे दिवस

गुरुवारपासून (ता. ९) या सणाला सुरुवात होणार आहे. यंदा गुरुवारी वसुबारस आणि शुक्रवारी (ता. १०) धनत्रयोदशी आहे. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी म्हणजे रविवारी (ता. १२) आले आहे. त्यानंतर एक दिवस सोडून मंगळवारी (ता. १४) बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आणि बुधवारी (ता. १५) भाऊबीज

 

महत्त्वाचे मुहूर्त

यंदा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त रविवारी दुपारी १.४५ ते ३.१० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत आहे. बलिप्रतिपदेच्या अर्थात दिवाळी पाडव्याच्या दिवशी वहीपूजनाचा मुहूर्त पहाटे २.३० ते ५.३०, सकाळी ६.४५ ते ७.३५ आणि सकाळी १०.५५ ते दुपारी १.४५ पर्यंत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.