तर ठरलं ! एकनाथराव खडसे ‘या’ तारखेला करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

1

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून स्वपक्षीयांवर नाराज असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय अखेर पक्का झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा जवळपास निश्चित समजला जात आहे. एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे.

एवढेच नव्हे तर त्यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाची तारीखही निश्चित झाली आहे. त्यानुसार 17 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात त्यादृष्टीने हालचालीही सुरु झाल्या आहेत.

विश्वसनीय वृत्तानुसार, एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये याबाबत बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे आणि खडसे यांचे समर्थक उपस्थितीत होते. या बैठकीत पुढील आठवड्यात राष्ट्रवादीत प्रवेश करायचा असं ठरल्याची शक्यता आहे. धुळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी याबद्दल तशी माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पाटील यांनी सेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. गेल्या काही महिन्यांपासून पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. एकनाथ खडसे यांच्यासह आपण लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत, अशी माहिती पाटील यांनी दिली.

1 Comment
  1. M V Urgunde says

    छान होतयं

Leave A Reply

Your email address will not be published.