ठाकरे सरकारने राज्यातील सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा केल्या रद्द

0

मुंबई । कोरोना संकट काळात राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील (professional) आणि बिगर व्यावसायिक (non-professional) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने ट्विटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. कोणतीही परीक्षा घेण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरवलेल्या निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील बिगर व्यावसायिक (non-professional) अभ्यासक्रमांच्या यादीत बीए, बीकॉम आणि बीएससी यांचा समावेश आहे. तर कायदा, अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम, स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर), फार्मसी हे अभ्यासक्रम व्यावसायिक (professional) यादीत मोडतात.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याआधी पंतप्रधान मोदींनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचं आवाहन पत्राद्वारे केलं होतं. एमडी, एमएस, डीएम परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश मोदींनी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाला द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पत्रातून केली होती. अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी कोरोना संकटाच्या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. निवासी डॉक्टर म्हणून ते सध्या मोलाची कामगिरी करत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलून त्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.