ठाकरे सरकारची आज बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा !

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, शनिवारी दुपारी २ वाजता विधानसभेत मांडला जाणार आहे. यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. तसंच यानिमित्ताने शक्तिप्रदर्शनही केले जाईल. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जाणार असला तरी १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा महाआघाडीने केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर गेल्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी अत्यंत घाईघाईने भल्या सकाळी पदाची शपथ घेतली होती. मात्र, फडणवीस यांचे दुसरे सरकार अवघ्या ८० तासांत बहुमताअभावी कोसळले. नंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. त्या आघाडीने आपल्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा राज्यपालांकडे केला होता. राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना व त्यांच्या सहकारी मंत्र्यांना गुरुवारी दादरच्या शिवाजी पार्कवर शपथ दिली. तसेच, ३ डिसेंबरच्या आत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी नव्या सरकारला निर्देश दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.