जीवंत काडतुस, एक गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरूणांना अटक

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाचोरा शहराजवळ एक जीवंत काडतुस एक गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांवर पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारोळा बु” ता. पाचोरा रोडवरील शांताराम सोनजी पाटील यांच्या जुन्या खडीमशिन जवळील महादेव मंदिर परीसरात वावरतांना दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या  घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय कायदा कलम ३ (२५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात एकच खळबळ माजली असून शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याने पाचोरा पोलीसांचा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक राहिलेला नसल्याचे सर्व सामान्य नागरिकांकडुन बोलले जात आहे.

 

पाचोरा शहरातील हिवरा नदीलगत असलेल्या सारोळा बु” रोडवरील महादेव मंदिर परीसरात दोन युवक गावठी कट्टा बाळगुन असल्याची माहिती जळगांव येथील स्थानिक गुन्हे शाखा विभागाला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या आदेशानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील, हरीष परदेशी व उमेश गोसावी यांनी सापळा रचून महादेव मंदिर गाठले. रात्री ८ वाजेच्या दरम्यान महादेव मंदिर परीसरात अशोक बाबुलाल पवार (वय  २८,  रा. सारोळा बु” ता. पाचोरा) व सुरज नारायण शिंदे (वय ३०,  रा. कृष्णापुरी, पाचोरा) यांच्याजवळ एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस व काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल असा ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.

यातील सुरज शिंदे हा चोरीच्या वाळुचा व्यवसाय करीत असुन अशोक पवार हा डुक्करे पाळण्याचा व्यवसाय करतो. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार संशयित आरोपींचा काहीतर मोठा कट रचण्याचा उद्देश असावा ? त्यामुळेच ते अंधाराचा फायदा घेऊन थेट सुन्नाट जागेवर कटाचा प्रयत्न करत होते. एल. सी. बी. चे विलास पाटील, हरिष परदेशी व उमेश गोसावी यांनी मुद्देमालासह आरोपी अशोक पवार व सुरज शिंदे यांना पाचोरा पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत घोडसे हे करीत आहेत. पाचोरा शहरात गेल्या महिनाभरापासून सट्टा, अवैध वाळू वाहतूक, पत्यांचे क्लब या सारखे अवैध धंदे बोकाळले असुन महिलांवर अत्याचार, विनयभंग, घरफोड्या, अल्पवयीन मुलींना फुस लावुन पळवुन नेणे यासारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे पोलिसांचा गाव गुंडांवरील धाक संपल्याने महिला वर्ग व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.