जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ची धडधड वाढली !

0

जिल्ह्यातील मोठ्या नेत्याची मुंबईत ना.महाजन यांच्या बंगल्यावर उपस्थिती

जळगाव :- भाजपातील मेगा भरतीने संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना भाजपाचे प्रवेशाचे वेध लागले असतांनाच जळगाव जिल्ह्यातील पक्षाचा मोठा नेता मुंबईत ना.महाजन यांच्या बंगल्यावर दोन तास तळ ठोकून बसल्याची चर्चा सायंकाळी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. माजी मंत्री असलेला नेता भाजपाच्या गळास लागल्याच्या चर्चेने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या घड्याळाची  धडधड वाढली आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसच्या चार आमदारांनी आपल्या हजारो समर्थकांसह आजच भाजपात प्रवेश केला. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकारण तापले आहे. भाजपातील या मेघा भरतीचे सुत्रधार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन असल्याचे सर्वश्रृत आहे. परिणामी त्यांच्या गृह जिल्ह्यात कॉग्रेस-राष्ट्रवादीचा बुरूज अभेद्य राहणे आश्‍चर्यच. मात्र, आज दुपारी 4 वाजेपासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक मोठा नेता ना.महाजन यांच्या मुंबई येथील बंगल्यावर तळ ठोकून असल्याची चर्चा जोर धरू लागली आणि घड्याळाची धडधड वाढली. जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व नामशेष झाले असतांनाच राष्ट्रवादीही कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जिल्हा कॉाग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याच्या दृष्टीने भाजपाची वाटचाल सुरू असल्याचे मानले जात आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या जामनेर येथील उपस्थितीला महत्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात रावेर वगळता काँग्रेसचे कुठेही अस्तित्व शिल्लक नाही. राष्ट्रवादीची ताकद सुध्दा पारोळा आणि जळगाव ग्रामिण पुरतीच मर्यादीत असतांना हा बळा नेता भाजपाचा गळास लागला तर शतप्रतिशत भाजपाच्या वाटचालीकडे हे सशक्त पाऊल असेल असे मानले जात आहे. राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यासहच कॉग्रेसचाही एक संभाव्य उमेदवार भाजपात प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईतील घडामोडींच्या चर्चेने आज जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असले तरी याचर्चेला रात्री उशिरापर्यंत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

मी पुण्यात..!
राष्ट्रवादीचे जिल्हा नेते, माजी पालकमंंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, मी पुण्यात आहे. मुंबईतील घडामोळींची काहीच माहिती नाही असे त्यांनी लोकशाहीशी बोलतांना सांगितले. चर्चांवर आपला विश्वास नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी अभेज्ञ राहिल असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.