जिल्हा भाजपतील गटबाजीने स्मिता वाघांचा घेतला बळी

0

2019 च्या लोकसभा निडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपतर्फे अधिकृतरित्या जाहीर झालेल्या आ. स्मिता वाघ यांची उमेदवारी ऐन वेळी रद्द केली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हे नाट्य घडले. 29 मार्चला स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारालाही प्रारंभ केला होता. मतदार संघातील सुमारे 110 गावांमध्ये जाऊन त्यांनी आपला प्रचारही केला होता. परंतु 3 एप्रिल रोजी मुंबईला खलबते झाली आणि त्यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली गेली. स्मिता वाघ यांचे तिकीट कापण्यामागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. खुद्द उमेदवार स्मिता वाघ आणि त्यांचे पती भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनाही कारण समजले नाही. 4 एप्रिल रोजी आ. उन्मेश पाटलांना उमेदवारी दिल्याचे पक्षातर्फे जाहीर झाले अन् आ. स्मिता वाघ यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्तक कार्यकर्ते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आ. उन्मेश पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. आ. स्मिता वाघ आणि उदय वाघ यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात कमालीची नाराजी व्यक्त केली. उमेदवारी देऊन नंतर ती रद्द करण्याऐवजी उमेदवारी द्यायलाच नको होती असे वक्तव्य दोघांनीही व्यक्त केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्मिता वाघ इच्छुक होत्या तथापि त्यावेळी ए.टी. पाटलांना उमेदवारी दिली गेली. आता 2019 साठी इच्छुक असतांना उमेदवारी देऊन ती काढून घेतली. 40 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असतांना साडेचार वर्षापूर्वी पक्षात आलेल्या आ. उन्मेश पाटलांना माझे तिकिट कापून त्यांना देण्यात आले असेही स्मिता वाघ पत्रकारांशी बोलतांना म्हणाल्या. भाजप जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांनी पक्षाने आमचा कोल्ड ब्लडेड मर्डर केला असा आरोप केला. स्वत:चे तिकिट कापले असतांना सुद्धा उन्मेश पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना स्वत: स्मिता वाघ जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होत्या. परंतु भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून उदय वाघ हे उन्मेश पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना उपस्थित राहायला हवे होते. परंतु त्यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली. कारण जिल्ह्यातील निवडणुकीत शत – प्रतिशतचा नारा देणारे जिल्हाध्यक्ष उदय वाघ उपस्थित राहायला हवे होते. कारण पक्ष सर्वश्रेष्ठ आहे आपण पक्षामुळेच आहोत हे उदय वाघांनी विसरू नये.
आ. स्मिता वाघ या पक्षांशी एकनिष्ठ असतांना तसेच अ.भा. विद्यार्थी परीषदेपासून ते प्रदेश महिला अध्यक्ष, जि.प. अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. इलेक्टिव्ह मेरीट असतांना त्यांचा पत्ता काटण्याचे कारण काय? स्मिता वाघ यांच्यापेक्षा आ. उन्मेश पाटील सरस आहेत का? या प्रश्नांची उत्तरे शोधले तर त्याचे उत्तर जळगाव जिल्ह्यातील भाजपमधील गटबाजी हे मिळते. ही गटबाजी स्मिता वाघ यांचे पती भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघांमुळे निर्माण झाली असे म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही. कारण 2014 ला विधानसभा निवडणुक झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातून एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन हे दोघे कॅबीनेट मंत्री बनले. त्यात खडसे हे तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याने त्यांना क्रमांक दोनचे महसूलसह सात खाती दिली गेली. त्यावेळी किंवा त्या आधी 2014 च्या लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा उदय वाघ हे एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक होते. त्यावेळी हरिभाऊ जावळे यांना मिळणारे लोकसभेचे तिकिट रक्षा खडसे यांना दिले गेले. त्यामध्ये खडसेंच्यावतीने उदय वाघ यांनी भूमिका पार पाडली होती. हे विशेष. खडसे यांचे मंत्रीपद गेल्यानंतर उदय वाघ हे गिरीश महाजनच्या गोटात आले आणि खडसे समर्थक कार्यकर्त्यांना सापत्न भावाची वागणूक देणे सुरु केली. खडसे आणि उदय वाघ यांच्यात विळ्याा भोपळ्यााचे नाते निर्माण झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले. त्यासाठी सुरुवातीला उदय वाघ हे स्वत: जळगाव लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. त्यानंतर आ. स्मिता वाघ यांचे नाव पुढे केले आणि स्थानिक पातळीवर जलसंपदा मंत्री यांना डावलून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचेशी संपर्क साधून स्मिता वाघांची उमेदवारी निश्चित केली. दरम्यान गिरीश महाजन यांनी इरिगेशनचे अभियंता प्रकाश पाटील यांच्या नावांचा पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता. परंतु उमेदवारी स्मिता वाघ यांना मिळाल्यामुळे महाजन हेनाराजच होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांची उमेदवारी पहिल्याच यादीत पक्षाने जाहीर केल्याने त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु झाला होता. देवकर हे माजी पालकमंत्री जिल्ह्यात केलेली कामे ही त्यांची जमेची बाजी होती. देवकरांसमोर स्मिता वाघ या कमी पडतात हे कारण पुढे करून महाजनांनी त्यांचा पत्ता कापला हे सर्वशृत आहे. त्यामुळे उदय वाघ हे आता खडसेंपासूनही तुटले आणि आता महाजनांपासूनही दूर गेले. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हा भरातील कार्यकर्त्यांना त्यांचेकडून जी वागणूक मिळाली त्यामुळे कार्यकर्ते नाराजच होते. महाराष्ट्रात क्रमांक दोनची मते मिळवून निवडून आलेले खा. ए.टी. पाटील यांचे तिकिट कापण्यामागे उदय वाघ हेच कारणीभूत असल्याने ते नाराज होते. बंड करून अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत होते. त्यांनी बंड केले असते तर त्याचा फायदा देवकरांनाच मिळेल ही भीती पक्षश्रेष्ठींपुढे होती. त्यातच अमळनेरचे भाजपचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनीही वाघांविरुद्ध दंड थोपटून अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचे जाहीर केले होते. याचा अर्थ आ. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होण्यास स्वत: जिल्हा भाजप अध्यक्ष उदय वाघ हेच कारणीभूत आहेत. गटबाजीचे राजकारण स्वत: उदय वाघ करीत असल्याचे उघड झाले. तसेच पक्षात यांची चलती त्यांच्याशी सलगी करण्याचा प्रकार फार दिवस चालत नाही. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत होण्याऐवजी खिळखिळे होते. या सर्व प्रकारातून उदय वाघ हे धडा घेतीलच. तसेच पक्षांशी ते एकनिष्ठ असल्याचा ते दावा करीत असतील तरी पक्षाने सुद्धा त्यांना भरपूर काही दिले आहे हे विसरता कामा नये.

Leave A Reply

Your email address will not be published.