जिल्हा परिषदेतील लाचखोर वरिष्ठ सहाय्यकाला अटक

0

जळगाव : शिक्षिका पत्नीची बालसंगोपनासाठी रजा मंजूर करुन मिळावी, यासाठी तक्रारदाराकडून १५०० रुपयांची मागणी करणार्‍या शिक्षण विभागातील  लाचखोर वरिष्ठ सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेजवळ रंगेहाथ पकडले आहे.

त्याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराची पत्नी शिक्षिका असून तक्रारदार यांच्या पत्नीची बालसंगोपन रजा मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक चेतन भिका वानखेडे (वय ४२, रा. मोचीनगर, गणपती मंदिराजवळ, धरणगाव) याने  १५०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

असा रचला सापळा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील   शिक्षण विभाग व परिसरात सापळा रचला होता. तक्रारदार व लाचखोर कर्मचार्‍याचे नव्या व जुन्या इमारती दरम्यानच्या तहसील कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरील चहाच्या टपरीजवळ   सुरुवातीला बोलणे झाले. नंतर कर्मचारी कार्यालयात गेला. काही वेळाने पैसे घेण्यासाठी तो  कर्मचारी इमारतीच्या खाली रस्त्यावर आला. खारे शेंगदाणे विक्रीच्या ठिकाणी कर्मचारी व तक्रारदार आले. लाचेची रक्कम कर्मचार्‍याने स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सूचवलेल्या सांकेतिक इशार्‍यानुसार तक्रारदाराने खिशातील चष्मा काढून डोळ्यांवर लावला. या सांकेतिक इशार्‍यानुसार कर्मचार्‍याने लाच स्वीकारल्याचे  सापळा रचलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना कळाले आणि सापळा रचणार्‍या अधिकार्‍यांनी त्या लाचखोर कर्मचार्‍याला रंगेहाथ पकडले.

शहर पोलिसात गुन्हा दाखल

यासंदर्भात तक्रारदाराच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून दुपारी संशयित आरोपी चेतन वानखेडे याला लाचेची रोख रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई या विभागाचे पोलीस अधीक्षक जी.एम.ठाकूर, निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, नाईक मनोज जोशी, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, महेश सोमवंशी यांनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.