जळगाव शहरासाठी कोरोनाचा दिलासा पण…

0

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जळगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले होते. दोन्ही लाटेमधील दिड वर्षाच्या कालावधीत जळगाव शहरात सर्वाधिक कोरोनाचे रूग्णसुध्दा आढळून आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाधीत रूग्णांच्या मृताचा आकडाही सर्वाधिक आहे. परंतु कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर दसरा आणि दिवाळीच्या सणांच्या काळात कोरोना बाधीतांची संख्या वाढेल असे वर्तविलेले भाकित मात्र खोटे ठरले ही बाब जळगाव शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक म्हणता येईल.

कारण दसरा दिवाळी सणात लोक एकमेकांच्या जवळ येतात. त्यातून विषाणूचा संकर होईल ही भिती व्यक्त केली जात होती. दुर्दैवाने ती खोटी ठरली ही जळगाव शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक म्हणावी लागेल. 8 नोव्हेंबरपासून सलग 6 दिवस कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही ही बाब शहराच्या दृष्टीने चांगली असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला थोपवून ठेवण्यासाठी प्रत्येकांनी कोरोनाचा संसर्ग फैलावणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत. दिड वर्षानंतर विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बाब असली तरी कोरोनाच्या नियमांचे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक- प्राध्यापकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक बाब असली तरी खान्देशात अजून 25 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. ही बाब महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षण संस्था चालकांनी याची दखल घेणे महत्वाचे ठरणार आहे. एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव आला तर अख्ख्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी प्राध्यापक, संस्थाचालक यांचे बरोबरच पालकांनीसुध्दा लक्ष देण्याची गरज आहे. म्हणूनच महाविद्यालयामध्ये लसीकरणाचे शिबीरे घेतली जात आहेत. विद्यार्थ्यांनी या लसीकरण शिबिराचा फायदा घ्यावा. ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण राहिले असेल तेथील संस्थाचालक व प्राध्यापकांना शासनातर्फे जबाबदार धरले पाहिजे. अन्यथा अशी महाविद्यालयाचे पुन्हा बंद केली पाहिजेत तरच त्यांचे गांभीर्य लक्षात येईल.

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरात 32 हजार 983 इतक्या जणांना कोरोनाची लागण झाली होती. पैकी 32 हजार 490 इतके रुग्ण कोरोनातून बरे होवून घरी गेले. शहरात एकूण 573 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 5 हजार 621 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी 5 हजार 475 रुग्ण बरे झाले. परंतु ग्रामीण भागातील 145 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमध्ये विशेषतः शहरात कोरोना रुग्णालये हाऊसफुल झाली होती. त्याकाळात काही जणांना इतर आजार झाला तर उपचारासाठी रुग्णालयात जागाच मिळत नव्हती. अशा रुग्णांना शहरभर अनेक रुग्णालयांमध्ये जाऊनसुध्दा एन्ट्री मिळत नव्हती. तेव्हा कोरोना बरोबर इतर आजाराच्या रुग्णांचे सुध्दा फार हाल झाले.

कोरोना रुग्णाच्या उपचारातील अनेक किस्से बाहेर आले. आपल्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला. खाजगी रुग्णालये व डॉक्टरांची मदत घेतली गेली. दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनच्या तुटवडा रुग्णांच्या जिवावर बेतला. शासकीय यंत्रणेने ऑक्सीजन मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. काही वेळा हतबल ठरले. ऑक्सिजनशिवाय काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले हे सत्य आहे. तरी पण आरोग्य यंत्रणा प्रशासन, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांनी जळगाव शहर आणि जिल्ह्यात केलेले कार्य वाखाणावे असे म्हणता येईल. कोरोना काळात कोरोना एके कोरोना यावरच लक्ष केंद्रित केल्याने जळगाव शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. या दरम्यान भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात झाल्याचे अनेक बाबींसमोर आल्या परंतु दिलासादायक चित्रामुळे त्यावर विशेष चर्चा झाली नाही एवढे मात्र निश्चित!

Leave A Reply

Your email address will not be published.