जळगाव महापालिकेत विविध पदांसाठी भरती ; आले इतके अर्ज

0

जळगाव:- महापालिकेत भरण्यात येणाऱ्या ८६ विविध पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी तब्बल २५२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज हे टायपिस्ट पदासाठी आले असून २० जागांसाठी तब्बल १ हजार ३३ उमेदवारांनी अर्ज जमा केले आहेत.

महापालिकेतर्फे हंगामी कालावधीसाठी करार भरतीने करण्यात येणाऱ्या भरतीसाठी दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. यासाठी आस्थापना विभागात अर्ज दाखल करण्याची मुदत आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होती. उमेदवारांकडून ऑफलाईन अर्जमागविण्यात आले होते. आज शेवटच्या दिवशी एकूण २५२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी करून महापालिकेतर्फे उमेदवारांची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
पद निहाय आलेले अर्ज

कनिष्ठ अभियंता बांधकाम (१०) ३४१, कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा (३) १००, कनिष्ठ अभियंता विदयुत – ( ५ ) – ७९, रचना सहाय्यक (४), १५३, आरेखक ( २ ) – ३१, अग्नीशमन फायरमन (१५) – १७६, वायरमन ( १२ ) – १६५, वीजतंत्री (६) २६१, आरोग्य निरिक्षक – (१०) – १८२, टायपीस्ट, संगणक चालक (२०) – १०३३ इतके अर्ज दाखल झाले आहेत.

शासनाचे कंत्राटी भरती रद्दचे आदेश; पण मनपाची भरती होणार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कंत्राटी भरती रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या भरती रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे महापालिकेच्या कंत्राटी भरतीबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्या आदेशाशी या भरतीचा संबध नसल्याचे सांगण्यात आले. महापालिका आयुक्त आपल्या अधिपत्याखाली सन १९४९ चे कलम ५३ नुसार सहा महिन्यासाठी कंत्राटी भरती करू शकतात. मात्र ही भरती कोणत्याही कंपनीतर्फे न करता महापालिका स्वतः करणार आहे. त्यामुळे शासन आदेश महापालिकेच्या भरतीला अडथळा ठरत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.