पगार न मिळाल्याने जळगावातील एस.टी. कर्मचाऱ्याची आत्महत्या

0

जळगाव प्रतिनिधी । मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून जळगावात एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज अनिल चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार हे या स्थितीसाठी जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत पगाराचा निर्णय झाला नाही तर एसटी बंद आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. तीन महिन्यांचा रखडलेला पगार आणि सानुग्रह अनुदान देण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, मनोज चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यात म्हटले आहे की, एस.टी. महामंडळातील अपुरा पगार आणि यातील अनियमितता यांना कंटाळून मी आत्महत्या करत आहे. यास जबाबदार एस.टी. महामंडळातील कार्यपध्दती आणि आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हे आहे. माझ्या व माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझी पी.एफ. व एलआयसी माझ्या परिवाराला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.

 

या घटनेने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी जळगाव डेपो बंद ठेवत निषेध केला आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांची जिल्हा रूग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.