जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन; आ. मंगेश चव्हाणांसह इतरांवर गुन्हा दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलन करीत कोरोनामुळे लागू केलेल्या जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  यांच्यासह इतरांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  शहरात बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. यामुळे त्यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अखिल  भारतीय बैलगाडा शर्यत संघटना, चाळीसगाव या संघटनेचे अध्यक्ष दीपक काशिनाथ गायकवाड यांना प्रशासनाने सध्या कलम ३७ (अ) लागू करण्यात आल्यामुळे आंदोलन करू नये असे सूचविले होते.

मात्र या नियमांचे उल्लंघन करून आज शहरातील घाट रोडापासून मोर्चा काढण्याची तयारी केली असता उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना पुन्हा सूचना करूनही हे आंदोलन करण्यात आले. यानंतर सिग्नल चौकात आ. मंगेश चव्हाण, दीपक काशिनाथ चव्हाण, भावेश मुकुंद कोठावदे, उत्तम भीकन पाटील, सौरभ अशोक पाटील, सोनू रमेश गायकवाड, अहमदखान युसुफ खान, गौतम दीपक सोनवणे, प्रवीण मराठे, दिलीप नथ्थू अहिरे, नितीन भगवान जाधव, सोमनाथ निंबा राजपूत, संतोष गणपत अगोणे (सर्व रा. चाळीसगाव) आणि किशोर गांगुर्डे (रा. नाशिक) यांच्यासह इतरांनी भाषण केले. तर या आंदोलनात इतर सुमारे १०० जण सहभागी झाले. या सर्वांनी कोविडच्या नियमांचे उल्लंघन केले.

या अनुषंगाने या सर्वांच्या विरूध्द भादंवि कलम १४३, १८८, २६९, २७०, २८९, ३४१ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (अ) चे उल्लंघन केल्या प्रकरणी १३५, ११७ आणि ११७ या कलमांच्या अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस कर्मचारी पंढरीनाथ दशरथ पवार यांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पो. ना. मुकेश पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.