जनुना तलाव गेटजवळ लिकेज पाईपलाईनमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

0

खामगांव  (प्रतिनिधी) :-  जनुना तलाव गेट जवळ अनेक दिवसांपासून पाईप लाईन लिकेज झाली असल्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून या ठिकाणी प्रतितलाव निर्माण झाला आहे. बगीचा परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले असून याकडे नगर पालीका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.लिकेज पाईपलाईनची दुरुस्ती करुन पाण्याचा अपव्यय थांबविण्यात यावा अशी मागणी युवा शक्ती ग्रुप व शिवशंभो ग्रुपचे सदस्य शिवाजी आनंदे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबतची माहिती मिळताच माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दि.7 मे रोजी  जनुना तलाव परिसराची पाहणी केली व लिकेज झालेल्या पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशि सुचना नगर पालीकेचे मुख्याधिकारी मनोहर आकोटकर यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली. काही वर्षा अगोदर  जनुना तलाव हे खामगांव शहराच्या वैभवात भर पाडणारे निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखले जात होते.

जनुना तलावाचे लोकवर्गणीतुन 2 वर्षा अगोदर खोलीकरण करण्यात आले असून तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. जनुना तलाव हे निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे बगीच्यात सकाळी व सायंकाळी काही नागरीक व्यायाम करण्यासाठी व फिरण्यासाठी येत असतात. तर काही जण तलावात पोहण्याचा आनंद घेत असतात. काही दिवसांपासून बगीच्याच्या गेटजवळील पाईपलाईन लिकेज होउन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत शिवशंभो ग्रुप व तलावावर फिरावयास व व्यायामसाठी येणा-या नागरीकांनी नगर पालीका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्या आहेत.परंतू तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.तसेच तलावाच्या छत्रीच्या खालची पाईपलाईन अनेक दिवसापासून लिकेज आहे. याकडेही नगर पालीका पाणी पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

याबाबत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मुख्याधिकारी यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करुन या दोन्ही पाईपलाईनचे लिकेज काढून पाण्याचा अपव्यय थांबविण्यात यावा अश्या सुचना दिल्या. तसेच जनुना तलाव सौंदर्यी करणाचे काम अनेक वर्षापासून रखडलेले असून बगीचा परिसरात ठिक-ठिकाणी घाणीचे साम्राज्य सुध्दा निर्माण झाले असल्याचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले. याबाबत कंत्राटदाराला सांगुन बगीचा परिसराची साफ सफाई  करण्यात येईल असे मुख्यधिका-यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.