चिंताजनक! ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण ‘या’ राज्यात आढळला

0

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात करोना विषाणूचा नवा व्हॅरियंट असलेल्या ओमायक्रॉनने प्रवेश केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ‘चिंता’ व्यक्त केलेल्या या नव्या व्हॅरियंटचे भारतात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले आहेत.

देशात कर्नाटक येथे सर्वप्रथम विषाणूच्या ओमायक्रॉन व्हॅरियंटची बाधा झालेले दोन रुग्ण आढळून आले होते. हे दोन्ही रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झाले होते. अशातच आता ओमायक्रॉनची बाधा झालेला तिसरा रुग्ण गुजरातेतील जामनगर येथे आढळून आला असून तो झिम्बाब्वे येथून प्रवास करून भारतात परतला आहे.

दरम्यान, कर्नाटकात आढळलेल्या दोन रुग्णांपैकी एका रुग्णाने २७ नोव्हेंबरलाच दुबईला पलायन केलं असल्याची माहिती मिळाली आहे. बंगळुरू विमानतळावर या ६६ वर्षीय प्रवाशाची करोना चाचणी करण्यात आली होती. यानंतर या व्यक्तीने एका हॉटेलमध्ये चेकइन केले. हा प्रवासी ‘ऍट रिस्क’ देशांतून आलेला असल्याने त्याचे सॅम्पल जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. यामध्ये त्याला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळले. परंतु याबाबतचा अहवाल येण्याआधीच हा प्रवासी दुबईला निघून गेला होता.

WHO ने व्यक्त केली चिंता

करोनाच्या या नव्या व्हॅरियंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली असून याचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो असाही इशारा देण्यात आलाय. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ विषाणूपेक्षा ओमायक्रॉन व्हॅरियंटमध्ये अनेक बदल आढळून आले आहेत. बहुतांश लसी काम करीत असलेल्या स्पीक प्रोटीन संदर्भात देखील अनेक बदल झाले असल्याने सध्या देण्यात आलेल्या लसी ओमायक्रॉनविरोधात प्रभावी ठरणार का? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

गरज पडल्यास ओमायक्रॉनवर स्पेशल बूस्टर डोस

‘ओमायक्रॉन व्हॅरियंटवर सध्या देण्यात येत असलेली कोव्हीशील्ड लस प्रभावी आहे की नाही याबाबतची माहिती येत्या २ ते ३ आठवड्यांमध्ये समोर येईल, या निष्कर्षातून ओमायक्रॉनवर बूस्टर डोसची गरज लागेल असे आढळल्यास तो तयार करण्यात येईल. ऑक्सफोर्ड येथील शास्त्रज्ञांनी याबाबत कामास सुरुवात केली आहे. पण ओमायक्रॉनसाठी स्पेशल डोस द्यावा लागेल याची शक्यता कमी वाटते.’ असं मत सिरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी मांडल आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.