चायना मांजामुळे कापला गेला डॉक्टरचा गळा (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

घातक असलेल्या चायना मांजावर शासनाकडून अनेकदा निर्बंध घालण्यात आलेले असतांना देखील या मांजाची खरेदी विक्री होत आहे. खांबाला अडकलेल्या याच चायना मांजामुळे जळगाव शहरातील सालार नगरात राहणाऱ्या एक डॉक्टर दुचाकीने जात असताना त्यांचा गळा कापला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर डॉक्टर १० मिनिटे जागीच पडून होते. एका रिक्षाचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने त्यांचे प्राण वाचले आहे.

फेसबुक लिंक

जवाद अहमद यांचे अमरावती येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून जळगावात ते सध्या प्रशिक्षण घेत आहे. डॉ.अहमद हे सालार नगरात राहत असून सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते दुचाकी क्रमांक एमएच.१९.एयु.६८१४ ने तांबापुरा येथे जात होते. महामार्गालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अडकून उडत असलेला मांजा अचानक त्यांच्या गळ्यावर आला आणि लागलीच त्यांचा गळा कापला गेला.

गळा कापल्यानंतर डॉ. अहमद हे रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीसह खाली कोसळले. स्वतः डॉक्‍टर असल्याने त्यांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्त्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. सुमारे दहा मिनिटे हा प्रकार ये-जा करणारे नागरिक पहात होते. मात्र तरीही कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. रिक्षाचालक कलीम शेख यांनी प्रसंगावधान राखून डॉक्टर अहमद यांना रिक्षात टाकले आणि सारा हॉस्पिटल गाठले.

याप्रसंगी रुग्णालयातील वैद्यकीय प्रमुख डॉ.मिनाज पटेल, नर्सिंग सुप्रीटेंडन्ट हर्षल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव रोखला. डॉ.अहमद यांच्या गळ्यात १ आणि गळ्यावर ११ टाके टाकण्यात आले. डॉ.अहमद यांचा मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, तसेच त्यांच्या हृदयाचे ठोके देखील कमी पडू लागले होते. वेळीच उपचार मिळाले नसते तर त्यांचा जीव गेला असता असे डॉ.मिनाज पटेल यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.