घंटागाडीत मातीचा भरणा केल्याप्रकरणी मक्तेदाराला दंड !

0

जळगाव (प्रतिनिधी) :- घंटागाडीत मातीचा भरणा केल्याप्रकरणी मक्तेदार वॉटर ग्रेस कंपनीला पाच हजार रुपयांचा दंड महापालिका प्रशासनाकडून ठोठावण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी शुक्रवारी सांगितले.

शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपा प्रशासनाने स्वच्छतेचा मक्ता वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे. मक्ता दि. 16 ऑगस्ट रोजी सुरु झाला मात्र  मक्ता सुरु झाल्यानंतर केवळ आठच दिवसांत घंटागाडीचे वजन जास्त वाढून मोबदला मिळावा यासाठी मक्तेदाराच्या कर्मचाऱ्याकडून घंटागाडीत माती भरण्यात येत असल्याचा व्हिडियो शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नार्इक यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला होता. या प्रकरणी मनपा परिसरात खळबळ उडाली होती.  महानगरपालिका प्रशासनाने मक्ता सुरु झाल्यापासून अटीशर्तीप्रमाणे मक्तेदाराने काम न केल्याने मक्तेदाराला 9 लाख 50 हजाराचा दंड ठोठावला होता.  दि. 29 रोजी झालेल्या महासभेतही लक्षवेधी मांडण्यात येवून या विषयावर दोन तास वादळी चर्चा होवून विरोधक सत्ताधाऱ्यांत खडाजंगी झाली होती.

अटीशर्तीनुसार 5 हजाराचा दंड
सफार्इ ठेक्याच्या अटीशर्तीत अ,ब,क,ड, इ पैकी इ मधील अट क्र. 7 नुसार मक्तेदाराला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.

उपायुक्तांनी केली पहाणी
शहरात विविध ठिकाणी इंद्रप्रस्थनगर, शिवकॉलनी, दूध फेडरेशन, पिंप्राळ्याचा भाग या ठिकाणी उपायुक्तांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यानुसार काम समाधानकारक होत असल्याचे त्यांनी सांगितले.शहरातील व्यापारी संकुलांकडे दिवसांतून दोनदा घंटागाडी फिरुन कचरा संकलन करणार असल्याचे ते म्हणाले. आधी 40 गाड्या होत्या. आता शंभर गाड्या आहेत. तसेच 17 अतिरिक्त वाहने पुरविण्यात आली आहेत.

नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज
कुठलीही योजना राबविताना नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी जबाबदारीने कचरा घंटागाडीतच ओला व सुका विभागून टाकला पाहिजे. मात्र तसे न होता नागरिकांकडून कचरा रस्त्यावर व मोकळ्या जागी फेकला जातो. आपले शहर सुंदर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीही असून त्यांनी कचरा संकलन करुन घंटागाडीतच टाकणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.