गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना अटक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

काही दिवसांपासून सुरु असलेला राज्यातल्या एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेलेल असताना दुसरीकडे राज्य सरकारने ३५० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तसेच, राज्य सरकाराने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. त्यानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना मंत्रालय परिसरातून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

भाजपाच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली. राज्यभरात एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु असून मुंबईत त्यासंदर्भात एसटी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी गोपिचंद पडळकर आणि किरीट सोमय्यादेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी मोर्चासाठी मंत्रालयाकडे जात असताना गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर गोपिचंद पडळकर यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर किरीट सोमय्या मंत्रालय परिसरात पोहोचले होते. त्यानंतर मंत्रालयाकडे जात असताना गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांच्यासह पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे कोणत्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

“जागोजागी व गावोगावी पोलिसबळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखलं जात आहे. यावरून सिद्ध होते की शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचाय. जेणेकरून पोलिसांच्या लाठ्या -काठ्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल. यांच्या निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्याने हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील”, असे पडळकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.