गॅस दरवाढीवरून विरोधकांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

0

नवी दिल्ली : गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. दिल्लीतील भाजपच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी दरवाढीचे पाऊल उचलण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

नव्या दरवाढीमुळे गॅस सिलिंडर वर्षभरात तब्बल 200 रूपयांनी महागला आहे. सरकारने जनतेच्या खिशालाच करंट दिला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्‌विटरवरून दिली.

भाजप हा जनहितविरोधी पक्ष आहे. त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या निर्णयांमध्ये आणि धोरणांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटत असते. अनेक विधानसभा निवडणुकांत पराभव होऊनही त्या पक्षाने त्यातून धडा घेतलेला नाही, असे तृणमूल कॉंग्रेसने म्हटले. माकपने मोदी सरकारवर टीका करताना भाजपच्या दिल्लीतील पराभवाचा संदर्भ दिला.

दिल्लीतील जनतेने भाजपला अनुकूल मतदान केले नाही. त्याची शिक्षा म्हणून गॅस दरवाढ करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया माकपकडून देण्यात आली. तीव्र महागाईमुळे गरीब आणि सामान्य जनता आधीपासूनच त्रस्त आहे. आता गॅस दरवाढीसारख्या निष्ठूर निर्णयाचा फटका कोट्यवधी जनतेला बसेल, अशा शब्दांत बसपच्या प्रमुख मायावती यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.