गिरीश कर्नाडही गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर

0

बंगळूर – पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येमागे असणाऱ्या संशयितांच्या हिट लिस्टवर ज्येष्ठ अभिनेते-नाटककार गिरीश कर्नाड यांच्याबरोबरच काही साहित्यिक आणि विचारवंत असल्याचे उघड झाले आहे. गौरी हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटकच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) याबाबतची माहिती दिली आहे.
कर्नाड यांच्याबरोबरच ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बी.टी.ललिता नाईक, अध्यात्मिक गुरू वीरभद्र चन्नमल्ला स्वामी आणि विचारवंत सी.एस.द्वारकानाथ यांची नावे एका डायरीत आढळली.

संबंधित डायरी गौरी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून जप्त करण्यात आली, असे एसआयटीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. गौरी यांची मागील वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या येथील घरासमोर गोळ्या घालूून हत्या करण्यात आली. कट्टर हिंदुत्ववादीविरोधी विचारसरणीसाठी त्या ओळखल्या जात.

कर्नाड, स्वामी आणि द्वारकानाथ हेही हिंदुत्ववादविरोधी विचारांसाठी ओळखले जातात. गौरी हत्याप्रकरणी आतापर्यंत कर्नाटक एसआयटीने सहा संशयितांना अटक केली आहे. त्यातील काही जणांचा उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.