भय्यूजींचे जाणे चटका लावणारे पण..!

0

मन की बात

  • दीपक कुलकर्णी
    8380090700

हल्ली आत्महत्त्यांच्या सत्राने समाजमनाला मोठा चटका लावला आहे. मध्यंतरी वरिष्ठ पोलीस अधिकारी हिमांशू रॉय यांनी आत्महत्त्या केल्यानंतर त्यावर बर्‍याच उलट-सुलट चर्चा झाल्यात हा विषय संपत नाही तोच राष्ट्रसंत असा लौकीक असलेल्या भय्यूजी महाराजांनी आपले जीवन संपविले आहे. अध्यात्माची वेगळी वाट धरुन महाराजांची समाजाला देण्याची भूमिका निभावली आहे. मात्र महाराजांच्या आत्महत्त्येने ते खरोखरच कौटुंबिक कलहात गुलफटले आणि त्यातून त्यांना मार्ग सापडला नाही म्हणूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा आता होत आहे. महाराजांनी आपले अख्खे आयुष्य समाजातील दिन-दुबळा, वंचितांसाठी खर्ची घातले सूर्योदयाच्या माध्यमातून देशभरात मोठा भक्तवर्ग उभारला मात्र त्यांच्या या जाण्याने अनेक चर्चेच्या वाटा मोकळ्या करुन दिल्या आहेत. महाराज म्हणून कोट्यवधीची संपत्ती जमा करून स्वतःच्या तिजोरीत बंदिस्त करून ठेवणार्‍यांपैकी भय्यूजी महाराज नव्हते. स्वतःची मालमत्ता विकून त्यांनी सामाजिक कार्याला भरीव मदत केली. अंधभक्तांचा गोतावळा जमवून स्वतःचा उदो उदो करून घेण्यात त्यांनी कधीच धन्यता मानली नाही. बेरोजगारांना रोजगार देण्यात, पैसे खर्च करण्यात त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. अठ्ठेचाळीस हजार तरुणांना त्यांनी नोकर्‍या मिळवून दिल्या. हे गणित आश्‍चर्यकारक असले तरी ते सत्य आहे. शेतकर्‍यांच्या घरात जन्मलेल्या या पुत्राने सातत्याने शेती आणि शेतकर्‍यांचा विचार केला आहे. शेतकर्‍यांसह नागरिकांच्या पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी जवळपास 1700 तलावांची बांधणी केली. जलही जीवन है हा मंत्र त्यांना अंगीकारला आणि त्यातून जलक्रांती घडविण्यावर भर दिला. खान्देशातही त्याचा प्रचार आणि प्रसार केला. विद्यार्थी, गरीब, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी शेकडो योजना राबवल्या. पर्यावरणावरचे मानवी अतिक्रमण वाढत असलेले पाहून त्यांनी वृक्षारोपणाचा संकल्प सोडला आणि तो पूर्ण केला आणि त्यांची नीट वाढ होईल अशी व्यवस्थाही घालून दिली. आध्यात्मिक गुरू या नात्याने भय्यूजी महाराजांचे अनेक राजकीय नेते, उद्योगपती, कलावंतांशी निकटचे संबंध होते. तथापि, यापैकी कोणत्याही संपर्काचा व संबंधाचा गैरवापर त्यांनी कधीही केला नाही. हे त्यांचे मोठेपण आहे. उदार अंतःकरण, उच्च शिक्षणातून आलेली प्रगल्भता, समाजासाठी असलेली संवेदना, यातून त्यांच्या संस्कारी मनाची जडणघडण झाली होती. मध्य प्रदेश सरकारने पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला परंतु भय्यूजी महाराजांनी हे पद नम्रपणे नाकारले. त्यांना कोणत्याही राजकीय पद आणि लाभाशिवाय समाजाची सेवा करायची होती. आयुष्यात कोणतीही कारकीर्द निवडण्याबरोबरच चांगला माणूस बनवण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे, हे ओळखून भय्यूजी महाराजांनी वाटचाल सुरू केली. पारधी समाजाच्या मुलांसाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगावला त्यांंनी आश्रमशाळा काढली. पारधी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याची त्यांची तळमळ सर्वांना अचंबित करते. सामाजिक उपक्रमांत समाजाला घेऊन येण्याचे श्रेय भय्यूजी महाराजांना द्यावे लागते.
मध्यप्रदेशात इंदूर या ठिकाणी राहून तिथून आपल्या कार्याचा आरंभ करून देशभर आपल्या कार्याचे जाळे पसरवणार्‍या कृतिशील अध्यात्म शिकवणार्‍या भय्यूजी महाराज यांचे असे वयाच्या अवघ्या पन्नाशीतच जग सोडून जाणे, हे चटका लावणारे आहे. आध्यात्मिक आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातही पोकळी निर्माण झालेली आहे; ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही हे सत्य असले तरी त्यांना घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करणे हीच श्रद्धांजली ठरणार आहे. भय्यूजींचे जाणे चटका लावणारे असेल पण त्याचा विचार न करता आता त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर मार्गक्रम करणे हेच कर्तव्य ठरणार आहे. भय्यूजी महाराज यांच्या अपघाती निधनाच्या उलट-सुलट चर्चा होत असतीलही मात्र त्याच्यातून चांगले कधीच बाहेर येणार नसून त्यावर मंथन करण्यापेक्षा महाराजांनी दिलेला विकासाचा संदेशाचा प्रचार-प्रसार करणे हेच योग्य ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.