मनाला चटका लावणारी भैय्युजी महाराजांची एक्झिट

0

अध्यात्माचे गुरु आणि अमोल असं समाजकार्य करणारे तसेच राष्ट्रसंत ही उपाधी प्राप्त करणारे उदयसिंह देशमुख उर्फ भैय्युजी महाराज यांनी मंगळवारी इंदौर येथील त्यांचे राहाते घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने महाराष्ट्र मध्यप्रदेशासह देशात पसरलेल्या त्यांच्या अनुयांसह इतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या – अवघ्या 50 व्या वर्षी भैय्युजी महाराजांची अशा प्रकारे एक्झिेट होईल असे स्वप्नात सुध्दा कुणाला वाटले नव्हते. दुपारी चार वाजता जेव्हा त्यांच्या आत्महत्येची बातमी कळली तेव्हा त्याचेवर विश्‍वासच बसत नव्हता. कारण लोकांनी आपलं जीवन कसं जगावं असं ते लोकांना सांगत होतो, अनेक समस्याग्रस्तांना त्यांच्या समस्यांवरील जो उपाय सूचवत असे त्यानेच अशा प्रकारचे जीवन संपवावे ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. अनेक जण भैय्युजी महाराजांकडे जाऊन त्यांच्या सान्निध्यात राहून आपले जीवन जगण्याची दिशा बदलली. रंजल्या गांजलेल्यांना त्यांनी आधार दिला.आदिवासी बालकांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून चैतन्य फुलविले.वेश्यांच्या मुलांसाठी पुण्यात त्यांनी शाळा उभारुन त्यामधून त्यांना शिक्षणाच्या एबीसीडीचे धडे दिले. ते भैय्युजी महाराज आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेतील ही कल्पना सुध्दा कोणाच्या मनाला शिवणार नाही. त्यांच्या अध्यात्मा विषयी आम्हाला जास्त माहिती नसली तरी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून अध्यात्मात फार मोठी शक्ती असल्याचे त्यांनी सिध्द केले होते.त्यामुळेच त्यांना अध्यात्मिक गुरु म्हटले जात असे. इंदौर मध्ये असलेल्या त्यांच्या आश्रमामध्ये अनुयायांचा, भाविक तसेच त्यांच्यावर प्रेम करणार्‍यांची सातत्याने गर्दी असायची. गोर गरीब, श्रीमंत,राजकारणी, व्यापारी,सामाजिक कार्य करणारे, तरुण-तरुणी ,स्त्री पुरुष त्यांचा सल्ला घेण्यासाठी, त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी भैय्युजी महाराजांना भेटायचे. भैय्युजी महाराज सर्वांना भेटायचे त्यांना सल्ला द्यायचेे. कुणावरही कधीही त्यांनी दुजाभाव केला नाही. दुसर्‍याच्या जीवनात चैतन्य फुलवावे त्यांचे जीवन मंगलमय व्हावे याचा सतत ध्यास घेणार्‍या या राष्ट्र संताने आपले जीवन स्वत:वर गोळी झाडून संपवावे ही घटनाच मुळी मनाला चटका लावणारी आहे. सुखाच्या शोधासाठी अनेक जण भैय्युजी महाराजाकडे जाऊन सुखाची प्राप्ती करुन घेणार्‍या प्रत्येकाला खुद्द भैय्युजी महाराजांचे जीवन दु:खाने भरलेले होते. त्यांच्या जीवनात ताण तणाव होता म्हणून त्यांना ही टोकाची भूमिका घ्यावी लागली. याची हळहळ त्यांच्या अनुयायासह सर्वांना होत आहे. त्यांनी मिळविलेल्या सुखातील काही हिस्सा भैय्युजी महाराज जगायला हवे ही एकच इच्छा सर्वांच्या मनात होती. पण नियतीला काही वेगळेच हवे होते.
भैय्युजी महाराजांच्या अशा अचानक जाण्याने, त्यांचा अनुयायी वर्ग पोरका झाला आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात
राहणारे भाविक ही वार्ता कळताच इंदौरकडे रवाना झाले
आहेत. इंदौरच्या आश्रमात जणू शोककळा पसरलीय. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच मोठी गर्दी
झालेली होती. त्यांच्या अंतिम यात्रेला जमलेला समुदाय पाहून तर खरोखरच भैय्युजी महाराज हे किती लोकप्रिय होते हे दिसून आले. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता.भैय्युजी महाराजांच्या अध्यात्मिक चिंतना बरोबरच किंवा त्यापेक्षाही जास्त त्यांचे समाजकार्य होते. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. विज्ञानाची सांगड घालून ते अध्यात्म करायचे. अध्यात्म शिकवायचे परंतु अंधश्रध्देला त्यांनी जीवनात कधीही थारा दिला नाही. कर्मालाच त्यांनी श्रेष्ठ मानले. कठोर कर्मातून, परिश्रमातूनच प्रगती होऊ शकते असे त्यांचे म्हणणे होते. अंधश्रध्दा, बुवाबाजीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. अध्यात्मापेक्षा त्यांचे समाजकार्य सुध्दा अनमोल असे होते. त्यामुळे भैय्युजी महाराजांच्या जाण्याने समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. मृत्यूपूर्वी दोन तास आधी त्यांनी व्टिट करुन आपले विचार व्यक्त केले आहे. त्यामुळे ते सतत समाजाचं कसं भलं होईल याचाच ते ध्यास घेत होते एवढे मात्र निश्‍चित.एचआयव्ही ग्रस्त चिमुकल्यांची व्यथा जाणून त्यांचेसाठी अकोला येथे आश्रम बांधला. त्यात एचआयव्ही ग्रस्त 52 मुले मुली राहतात. त्यातील सात मुलांची त्यांनी लग्नही लावून दिले. पुणे-एरवडा जेलमध्ये भैय्युजी महाराजांचे प्रवचन झाले. त्यातील खुनाची शिक्षा भोगणार्‍याची शिक्षा संपल्यावर त्याला महाराजांनी आश्रमात पुरोहिताची जबाबदारी सोपवली. हे भैय्युजी महाराजच करु शकले.
अध्यात्म आणि उच्च कोटीची समाजसेवा करणारे भैय्युजी महाराज वादाच्या भोवर्‍यातही सापडले होते. त्यांना भेटण्यासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे, गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मनसे प्रमुख राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री त्यांचेकडे जात असत. राजकीय वाद मिटविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. या राजकीय पुढार्‍याशी असलेले त्यांचे संबंधावरुन ते स्वत:वर वाद ओढवून
घेतले होते. त्यातच पहिल्या पत्नीचे झालेले निधन, त्यानंतर दुसर्‍या विवाहाचे निर्माण झालेला वाद, त्यातच एका महिलेने
त्यांच्याशी असलेल्या संबंधावरुन केलेले आरोप यामुळे त्यांच्या आध्यात्मकतेवर नेहमीच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत राहिले. त्यांचेवर असे- आरोप होत राहिले आणि भैय्युजी महाराज यांचे बाबतीत काहीसे तसेच घडले .संसारी व्यक्ती आणि आध्यात्म यातील व्दंव्द त्यांनी संपविण्याचा प्रयत्न केला पण त्याला उशीर झाला होता. नैराश्याने त्यांना घेरले होते. त्यातच त्यांना अनेक शारीरिक व्याधी जडल्या होत्या. त्यातून त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असावी असा तर्क करण्यात येतो. कौटुंबिक कलहातून ते ताण तणावात वावरत होते. त्यातून आत्महत्या पत्करली असावी. भैय्युजी महाराजांनी असं आपलं जीवन का संपवले यावर चर्चाचर्वण करण्यापेक्षा त्यांची समाजसेवा आणि अध्यात्माचं कार्य पुढे सुरु ठेवणं ही त्यांना खर्‍या अर्थाने श्रध्दांजली ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.