गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली!

0

पोळ्याचा बाजार फुलला : प्लॅस्टिकच्या जागी आल्या कागदी, कापडी वस्तू

जळगाव, दि.6 –

जिल्हाभरात बाप्पाच्या आगमनासाठी अबालवृध्द तयारीला लागले आहे. गणरायाची आतुरला बाजारात नवचैतन्य निर्माण करत असते. बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठ सजू लागली असून विक्रेत्यांनी दुकाने थाटण्यास सुरूवात केली आहे. प्लॅस्टिक बंदीचा परिणाम बाजारपेठेत दिसू लागला असून विक्रेत्यांनी बाप्पाच्या साज-शृंगारासाठी यावर्षी नाविन्यपूर्ण साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. कागदी आणि कापडी वस्तूंसह विविध दागिने देखील बाजारात उपलब्ध आहेत.
जिल्हाभरात विशेषतः शहरात महामार्गालगत गणरायाच्या मूर्ती साकारणार्‍या कारागिरांचे रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपलेल्या बाप्पाच्या आगमनासाठी मंडळांची उभारणी जोमाने सुरू असून दुसरीकडे सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी बाजारपेठेत आता होऊ लागली आहे.
टॉवर चौकापासून सुभाष चौकापर्यंत गर्दी
टॉवर चौक, घाणेकर चौक, गांधी मार्केट परिसर, अशोक टॉकीज परिसर, चित्रा चौक, पोलन पेठ, सुभाष चौक परिसरात विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुर्तफा हातगाड्यांवर दुकाने थाटण्यास सुरूवात केली आहे. सायंकाळी ऊन कमी झाल्यानंतर नागरिकांची बाजारात गर्दी दिसून येत असते. पोळ्यासाठी देखील अनेकांनी साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे.
विविध साहित्याचे आकर्षण
बाजारात कागदी पताका, मोत्याच्या माळा, मुकुट, शेला, फेटा, चमकी, गोलके, लायटींग, टोप्या, तोरण यासह चमकी, विविध प्रकारचे हार, रंगीत कागद, फिरते चक्र, कळस, कंदील, पूजेचे ताट, आसन, कागदी शिंकाळे, मणी, फुले, रंगबिरंगी पिसे इत्यादी सजावटीचे साहित्य ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पर्यावरणपूरक साहित्य विक्रीवर भर
बाजारात मोती, चमकीच्या माळांसह कापडी फुलांच्या माळाही दाखल झाल्या आहेत. परंतु यावर्षी प्लास्टिक बंदीचा परिणाम देखील बाजारावर दिसून आला. इको फे्रंडली गणेशोत्सवाला भर देण्याचा कल वाढत असून प्रदुषणाचा विचार करता गणेशभक्तही पर्यावरणपूरक साहित्य वापरण्याकडे वळत आहे. बाजारात यावर्षी कापडी फुलांच्या माळांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यामध्ये तीन फुटांपासून 10 फुटापर्यंत माळा उपलब्ध असून त्यांची 40 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
पोळ्याचा बाजार फुलला
गणरायासाठी यंदाही बाजारपेठेत सजावटीचे आकर्षक साहित्य दाखल झाले आहे. परंतु सध्या शेतकरी वर्ग पोळ्यासाठी खरेदी करण्यासाठी येत असल्याने बळीराजाची गर्दी दिसून येत आहे. बैलांना सजविण्यासाठी वापरण्यात येणारा झुला, नाळ, घंटा, शिंगाला लावण्याचे रंग, रंगीबेरींगी दोर, घुंगरू, काचेची झालर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

गणरायासाठी विक्रेत्यांनी खास साज
शृंगार विक्रीसाठी आणलेले आहेत. पुणे आणि मुंबई येथील हे साज गणेशभक्तांना आपल्याकडे आकर्षून घेत आहेत. कंठीहार, चिकमोत्यांची माळ, डायमंड नेकलेस या दागिन्यांचा यात समावेश असून 40 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच 50 रुपयांपासून ते 75 रुपयांपर्यंतचे बाप्पांचे उपरणेदेखील विक्रेत्यांनी आणलेले आहेत. कागदी पताका लावून गणेश मंडळांसह घरीही सजावट केली जाते. यासाठी वेगवेगळ्या रंगातील पताकांना मागणी असते. आता त्यात ठिपक्या ठिपक्यांच्या पताकादेखील दाखल झाल्या असून त्यांना पसंती दिली जात आहे. 20 ते 40 रुपयांपर्यंत पताकांची पाकीटे उपलब्ध आहेत.

सोमवारनंतर वाढणार लगबग
रविवारी पोळा असल्याने बाजारात सध्या पोळ्याची गर्दी आहे. सोमवारनंतर गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटली जाणार आहेत. त्यामुळे तीन ते चार दिवसात गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे. मनपात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत विक्रेत्यांना मोकळ्या जागी बसविण्याचे निश्‍चित करण्यात आले असल्याने सोमवारनंतर जागा निश्‍चितीनंतर लगबग वाढणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.