खडसे मला भेटले, त्यांच्याशी माझी चर्चाही झाली पण ….. ‘त्या’ भेटीवर शरद पवारांचे भाष्य

0

औरंगाबाद : भाजपमध्ये नाराज ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजप सोडणार अशी चर्चा आहे. खडसे यांनी जाहीररित्या पक्ष सोडणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांची गुप्त भेट घेतली होती. दरम्यान, ‘एकनाथ खडसे हे मला भेटले होते. त्यांच्याशी माझी चर्चाही झाली. पण त्यांचं समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडं नाही,’ असं अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पवारांची ही भूमिका म्हणजे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या खडसेंनाच धक्का असल्याचं बोललं जात आहे.

औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपवर नाराज असलेल्या व गोपीनाथ गडावर झालेल्या जाहीर मेळाव्यात राज्यातील नेतृत्वावर तोफ डागणाऱ्या खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची गुप्त भेट घेतली होती. त्यामुळं त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला हवा मिळाली होती. औरंगाबाद येथे पत्रकारांनी शरद पवार यांना त्याबाबत विचारलं असता त्यांनी चर्चेतील हवाच काढून टाकली. ‘खडसे हे मला भेटले होते. माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्यांचं समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडं नाही,’ असं ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.