खडसेंचे राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मौन; फडणवीसांच्या कार्यक्रमाला जाणार का?

0

गेल्या काही दिवसापासून नाराज असलेला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खडसे गेल्या चार दिवसांपासून मुंबईत होते. ते रविवारी जळगावात परतले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी प्रवेशाबाबत काही पत्ते उघडतील, अशी शक्यता वर्तवली जात असताना त्यांनी मात्र, या विषयावर बोलणे टाळत मौन बाळगले.  माजीमंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे सुरू केलेल्या रुग्णालयाच्या उदघाटन सोहळ्याचा कार्यक्रम १३ ऑक्टोबर रोजी होणार असून, या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही याबाबत एकनाथ खडसे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

एकीकडे गेल्या महिन्यात एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचे नाव घेत थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घडामोडीत गेल्या चार दिवसांपासून खडसे हे मुंबई येथे होते. यादरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली. त्यामुळे मंगळवारी जामनेर येथे फडणवीस यांना एकनाथ खडसे हे भाजपचे नेते म्हणून भेटतील की तोपर्यंत राष्ट्रवादी मध्ये जातील, अशीही उत्सुकता निर्माण झाली. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपल्याला निमंत्रण पत्रिका आहे की नाही हे पहावे लागेल, असे खडसे यांनी शनिवारी सांगितले होते. त्यानंतर रविवारी याविषयी त्यांना विचारले असता ‘सर्वच आता सांगून टाकले तर कसे चालेल, उत्सुकता राहू द्या’, असे सांगितले. त्यामुळे एका दिवसावर आलेल्या या कार्यक्रमास खडसे उपस्थित राहणार की नाही, याबाबत सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.