कोविड रुग्णवाहिका नसल्याने कोरोना बाधीताचा मृत्यू

0

जामनेर(प्रतिनीधी):- येथील ६५ वर्षीय कोरोना बाधीत वृध्दाचा खाजगी रुग्ण वाहिकेत गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आज दि.४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. सविस्तर वृत्त असे की,आज दि.४ रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील जामनेरपुरा भागातील रहिवासी दयाराम गंभीर साबळे ६५ वर्षीय वृद्ध कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांना घरून आणण्यासाठी शासनाची कोविड रुग्ण वाहिका जाणे बंधनकारक होते.परंतु शासनाची रुग्ण वाहिका उपलब्ध नसल्यामुळे लोक प्रतिनिधीनी विनंती केल्यानंतर शहरातील जी.एम.फाऊंडेशनची रूग्ण वाहिका क्रमांक एम.एच.१८ बी.जी.११७६ मधून रुग्णाला सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले .तेथून कोविड सेंटरला नेण्यासाठी १०८ कोविड रुग्ण वाहिका हजर नसल्यामुळे व रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर रुग्ण तसाचा तसा भर उन्हात उभ्या असलेल्या जी.एम. फाऊंडेशनच्या रुग्ण वाहिकेत सुमारे चार तास पडून असल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.मृताच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांविषयी विचारपुस केली असता तुमच्या रुग्णाला कोविड सेंटरला पाठविण्यात आले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले .परंतु दुपारी २ वाजेच्या सुमारास मृतांचे नातेवाईक परत उपजिल्हा रुग्णालयात तपास करण्यासाठी आले असता त्यांना साबळे रुग्ण वाहिकेत आढळून आल्यानंतर सदर इसम मृत झाल्याचे निष्पन्न झाले.मृताच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी करून संताप व्यक्त केला .व दोषी डॉक्टरांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावेळी रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आ.गिरीष महाजन,प्रांताधिकारी दिपमाला चौरै,तहसिलदार अरुण शेवाळे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील,तलाठी नितिन मनोरे आदिनी रुग्णालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला व संतप्त झालेल्या जमावाला शांत केले.यावेळी नोडल अधिकारी डॉ.विनय सोनवणे सह वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत महाजन उपस्थित होते.घटना घडल्या नंतर मृतांच्या नातेवाईकांनी नोडल अधिकारी डॉ.विनय सोनवणे यांच्याशी दुरध्वनीव्दारे संपर्क साधला असता माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली.पण थोड्याच वेळानंतर ते उपजिल्हा रुग्णालयात आल्याचे पाहून मृत नातेवाईकांच्या भुवया उंचावल्या व त्यांनी डॉक्टरांबदल तीव्र संताप व्यक्त केला. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नगरपालिकेतर्फे शहरातील स्मशानभूमीत मृतदेहावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.मयताच्या पश्चात २ मुलं,१ मुलगी,सुना,जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

झालेलीघटना अत्यंत दुर्दैवी असून घटनेची सविस्तर माहिती घेऊन दोषी असलेल्या व्यक्ती वर निलंबनाची कारवाई करणार. दिपमाला चौरे प्रांताधिकारी. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सर्व सामान्य जनतेला आपला जीव गमावला लागला असून शासकीय यंत्रणा असा प्रकार अजून किती दिवस चालू ठेवणार? तालुक्यात रुग्ण वाहिकेची संख्या अतिशय कमी असून शासनाने जास्तीत जास्त रुग्ण वाहिका उपलब्ध करून द्याव्या.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन कुचकामी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.