कॉंग्रेसच्या बैठकीत राहुल गांधीसह अनेक वरिष्ठ नेते राजीनामा देणार?

0

नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुकीत लाजिरवाणा पराभव स्वीकारायला लागल्यानंतर आता कॉंग्रेस पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांकडून आपापले राजीनामे दिले जाण्याची शक्‍यता आहे. शनिवारी होणाऱ्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये दस्तुरखुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे देखील पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्‍यता आहे.

या पराभवाबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला “युपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील उपस्थित राहणार आहेत. पक्षातील धुरिणांच्या म्हणण्यानुसार पक्षाचे धोरणच या पराभवाला कारणीभूत ठरले. त्या धोरणांचा परामर्श घेणे आवश्‍यक आहे. कॉंग्रेस पक्षाने सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरी केली आहे. 2014 साली पक्षाला 44 तर यंदा 52 जागाच कॉंग्रेसला जिंकता आल्या आहेत. या बैठकीमध्ये राहुल गांधी स्वतः पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्‍यता आहे.

देशपातळीवर झालेल्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारण्यावरून कॉंग्रेस पक्षामध्ये खासगीत चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक राज्यातील प्रमुख नेत्यांनी आणि राष्ट्रीय पातळीवरील काही नेत्यांनीही आपापल्या पदांचे राजीनामे वरिष्ठ नेत्यांकडे पाठवायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशात प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनाईक यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापले राजीनामे राहुल गांधी यांच्याकडे पाठवून दिले आहेत. याशिवाय कर्नाटकचे प्रभारी एच.के.पाटील यांनीही पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे.

18 राज्यांमध्ये खातेही नाही उघडले

कॉंग्रेसला यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत 18 राज्यांमध्ये खातेही उघडता आलेले नाही. त्यामध्ये आंध्रप्रदेश, गुजराथ, दिल्ली अणि हरियाणाचा समावेश आहे. काही प्रादेशिक पक्षांनी कॉंग्रेसच्या खालोखाल जागा मिळवल्या आहेत. द्रमुक 23, तृणमूल कॉंग्रेस आणि वायएसआर कॉंग्रेसने प्रत्येकी 22, शिवसेना आणि संयुक्‍त जनता दलाने प्रत्येकी 16 जाग जिंकल्या आहेत. या पक्षांची कामगिरी राज्य पातळीवर कॉंग्रेस पेक्षाही सरस ठरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.