‘केईएम’मध्ये तीन महिन्यांत निर्भया सेंटर कार्यान्वित

0

मुंबई –

पीडित महिलांना तातडीने वैद्यकीय व अन्य सर्व मदत मिळावी, यासाठी आवश्यक असणारे निर्भया सेंटर केईएममध्ये येत्या तीन महिन्यांत कार्यान्वित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी मंगळवारी विधानसभेत केली. मालाड पूर्व येथे अल्पवयीन गतिमंद मुलीचे अपहरण करून तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने निर्भया निधीची स्थापना करून बलात्कार आणि अन्य दुर्दैवी घटनांतील पीडित महिलांसाठी निर्भया सेंटर सुरू करण्याची योजना आणली होती. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. अशा प्रकारचे एक सेंटर मुंबईत केईएम रूग्णालयात सुरू व्हावे यासाठी पोलीस, महापालिका यांच्याकडे गेली दीड वर्षे पाठपुरावा सुरू केला. मात्र, पोलीस सहकार्य करीत नसल्याने ही योजना रखडली, अशी तक्रार आमदार आशिष शेलार यांनी केली. पीडित महिलेला कायदेशीर व वैद्यकीय मार्गदर्शन आणि पुरावे गोळा करण्यासाठी मदत करणे, तसेच तिला मानसिक आधार देणे,  योग्य वेळी योग्य उपचार मिळणे अशा प्रकारची मदत देणारे हे सेंटर असावे अशी ही संकल्पना आहे. हे सेंटर सुरू करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या एक महिन्यात देण्यात येतील. हे सेंटर तीन महिन्यांत कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मालाड पूर्व येथील गतिमंद मुलीच्या अपहरण प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून पुनर्वसनाची जबाबदारी सरकार घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.