कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगावात जंगी स्वागत

0
भव्य मिरवणूक काढत शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
जळगाव
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे आज (बुधवारी) दुपारी पहिल्यांदा जळगावात दाखल झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढत त्यांचे जंगी स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी तसेच बँजो बँडच्या गाण्यांवर थिरकत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, भाजपचा बालेकिल्ला भेदणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद आल्याने शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांची भव्य मिरवणूक काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
मुंबईहून गीतांजली एक्सप्रेसने दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गुलाबराव पाटील यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. रेल्वे स्थानकाच्या फलाटापासूनच कार्यकर्त्यांनी वाद्य वाजवण्यास तसेच घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी देखील झाली होती. मात्र, पोलिसांनी गर्दी पांगवल्याने अनर्थ टळला. रेल्वे स्थानकाबाहेर आल्यावर गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक नेहरू पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. त्याठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मिरवणूक आटोपली.
दरम्यान, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझ्यावर कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपला पहिला अजेंडा असणार आहे. सोबतच प्रशासनातील मस्तवाल अधिकाऱ्यांना वठणीवर आणून प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यावर भर असेल. अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही तर मात्र, शिवसेना स्टाईलने त्यांच्याकडून कामे करून घेऊ, असा खणखणीत इशारा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.
चेंगराचेंगरी
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे आज (बुधवारी) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जळगावात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन 2 महिला पदाधिकारी जखमी झाल्या.
उद्धव ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच जळगावात दाखल झाले. मुंबईहून ते गीतांजली एक्सप्रेसने जळगावात पोहचले. त्यांचे स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गुलाबराव पाटील हे रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मंगला बारी आणि शोभा चौधरी या जखमी झाल्या. ही बाब काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघांना सुखरूप बाहेर काढले.
दरम्यान, गर्दीमुळे गुलाबराव पाटील हे देखील मध्ये अडकले होते. मात्र, त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांनी त्यांना सुरक्षेचे कडे देत जिन्याच्या एका बाजूला केले. गर्दी ओसरल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी गर्दी पांगवल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.