कृषिमंत्रालयाकडून खान्देशातील केळीचे नमुने व्हायरॉलॉजी विभागाकडे रवाना

0

केळी उत्पादकांना मोठा दिलासा ; आ. खडसेंसह शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्र्यांची भेट

* बाजारपेठेत सुमारे एक हजार टन केळी पडून
* जळगाव आणि बुलढाणा परिसरातील केळीवर लागण नाही
* 1500 ते 1600 हेक्टर जमिनीवरील केळी पिकाचे नुकसान
* भरपाई देण्याची मागणी

नवी दिल्ली :-खान्देशातील केळीवर निपाह रोगाचे विषाणू नसल्याबाबत कृषिमंत्रालयाकडून खान्देशातील केळीचे नमुने व्हायरॉलॉजी विभागाकडे रवाना करण्यात आली असून दोन दिवसात याबाबतच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खान्देशातील केळीवर निपाह रोगाची लागण नसल्याचा संदेश कृषी विभागाकडून प्रसारित करण्यात येईल असे आश्वासन कृषिमंत्र्यानी आज खान्देशातील शिष्ट मंडळाला दिले असून यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .दरम्यान निपाह रोगाची खान्देशातील केळींवर लागण झाल्याची अफवा पसरविण्यात आल्याने बाजारपेठेतील सुमारे १ हजार टन केळी पडून असल्याने यासाठी कृषी मंत्रालयात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची माजी महसूल व कृषी मंत्री आ.एकनाथराव जी खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे आदींनी आज सकाळी 11 वाजता भेट घेऊन केळी उत्पादकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी केली .

निपाह रोगाचे विषाणू केळीवर असल्याच्या अफवेमुळे उत्तर भारतात केळी खरेदी करण्यासाठी व्यापारी तयार नाहीत आणि गेल्या 10 ते 12 दिवसापासून तेथील बाजारपेठेत सुमारे एक हजार टन केळी पडून आहे.
यामुळे केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, मालवाहतुकदार आदींमध्ये घबराटीचे वातावरण आहे . जळगाव आणि बुलढाणा परिसरातील केळीवर कोणत्याही प्रकारची लागण नसून, उत्तर भारतातील पडून असलेल्या केळीमधील नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवावेत. खान्देशातील केळी वर निपाह रोगाचे विषाणू असल्याची अफवा पसरवनाऱ्यावर कडक कारवाई करावी आणि खान्देशातील 1500 ते 1600 हेक्टर जमिनीवरील केळी पिकाचे नुकसान झाले असून सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांच्याकडे केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी सदर केळीचे नमुने व्हायरॉलॉजी विभागाकडे पाठवून त्याची दोन दिवसात तपासणी करावी आणि सरकार कडून खान्देशातील केळीवर निपाह रोगाचे विषाणू नसल्याचा संदेश प्रसारित करण्यात यावा अशा सूचना दिल्या. जेणेकरून जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, मालवाहतूकदार यांचे नुकसान होणार नाही.
—–नुकसान भरपाईसाठी बैठक —–
केळी उत्पादकांचे झालेले नुकसान पाहता, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण घेतले आहे, राज्य सरकार आणि विमा कंपन्या चे अधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी बैठक घेतली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण घेतलेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी काय उपाय योजना करता येतील याचा राज्य सरकारकडून अहवाल मागवण्यात आला आहे जेणेकरून त्या शेतकऱ्यांना दिलासा देता येईल.
——-शिष्टमंडळात यांचा होता सहभाग —-
शिष्टमंडळात मा. शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके, रावेर तालुकाध्यक्ष सुनील लक्ष्मण पाटील, पंस सदस्य विकास पाटील, गोपाळ लक्ष्मण नेमाडे, प्रल्हाद पंडित पाटील, महेश नारायण पाटील, रमेश कडू पाटील, किशोर रामू महाजन, काशीनाथ मोतीराम धनगर, रामदास त्र्यंबक पाटील या शेतकऱ्यांचा समावेश होता.
——————–

Leave A Reply

Your email address will not be published.