किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती गठीत

0

मुंबई

राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींसोबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुकाणू समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २४ सदस्यीय सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम करताना त्यांचे पावित्र्य जपून ऐतिहासिक व पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का पोहोचणार नाही याची खबरदारी घेणार आहे. पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड, तोरणा या किल्ल्यांचे संवर्धन केले जाणार आहे.

या समितीमध्ये  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील  उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विशेष आमंत्रित सदस्य म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचा समावेश असणार आहे, तर सदस्य म्हणून शिवसेना सचिव आदेश बांदेकर, आमंत्रित सदस्य म्हणून मिलिंद गुणाजी, ऋषिकेश यादव, माधव फडके, उमेश झिरपे, नितीन बानगुडे पायील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दर तीन महिन्यांनी एकदा या समितीच्या बैठका होईल. यामध्ये गडकिल्ल्यांच्या विकासासाठी अग्रक्रम ठरविण्यात येणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विविध सुविधा करताना गडकिल्ल्यांचे हरितीकरण तसेच तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.

तसेच  गडकिल्ल्यांच्या आजूबाजूला असलेल्या ५० किमी अंतरावर असलेली पर्यटनस्थळे, साहसी खेळ, गिर्यारोहण, किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ, तिथे घडलेला पराक्रम, तिथले वन्य जीव, वनसंपदा, जैवविविधता जोपासत आजूबाजूची लोकपरंपरा, गडाच्या अनुषंगाने काही लढाया झाल्या असतील तर त्यांची माहिती संकलित करून गडांच्या पायथ्याशी असलेल्या गावात पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. तिथे मूळ गडाची प्रतिकृती उभारून ऐतिहासिक वातावरण निर्माण केले जाईल तसेच लाईट अॅण्ड साऊंड शोही दाखवला जाईल. याविषयीचा आराखडा पर्यटन विभागाकडून या समितीला सादर करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.