आषाढी वारीत कोरोनाचा शिरकाव, 37 वारकऱ्यांना कोरोनाची लागण

0

आळंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता  यंदाच्या  वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे . तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यातच आता आषाढी वारीत कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे.

आज  आळंदीतून  आषाढी वारीसाठी  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळ्याला उपस्थित असलेल्या 368 वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यातील 37 वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरूवारी 22 वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यात आता अजून 15 जणांची भर पडल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे यांनी दिली आहे.

मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकणार आहेत. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्याठिकाणी इतरांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं. आषाढी वारीसाठी शासनाने वाखरी ते ईसबावी येथील विसावा मंदिरपर्यंतचे तीन किमी अंतर सर्व मानाच्या पालख्यांच्या चाळीस वारकऱ्यांनी पायी वारीसाठी परवानगी दिली आहे.

वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही, असं सरकारने यापुर्वी स्पष्ट केलं होतं. आता हीच चिंता खरी ठरताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.