कितीही संकटे आली तरी भारतीय सिनेमा टिकून राहील – नांदगावकर

0

जळगाव  | प्रतिनिधी 

कोविडसारखी कितीही व कोणतीही  संकटे आली तरी भारतीय सिनेमा टिकून राहील असा विश्वास  फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया (पश्चिम विभाग)चे उपाध्यक्ष आणि सिनेमा अभ्यासक सुधीर नांदगावकर यांनी व्यक्त केला.

मीडिया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम)  या प्रसार माध्यम शिक्षकांच्या राज्यस्तरीय  संघटनेतर्फे आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ‘सिनेमा आणि सिनेमा चळवळ ‘ या विषयावर ते बोलत होते . अध्यक्षस्थानी मीम संघटनेचे अध्यक्ष डॉ .सुधीर भटकर होते . कार्यक्रमास संघटनेचे  कार्याध्यक्ष डॉ . रवींद्र चिंचोलकर( सोलापूर),कार्यकारणी सदस्य डॉ.शिवाजी जाधव (कोल्हापूर) ,डॉ.सुहास पाठक (नांदेड), डॉ.शाहेद शेख (औरंगाबाद ) , डॉ.मोईज हक(नागपूर) संघटनेचे सचिव डॉ.विनोद निताळे  यासह डॉ.सोमनाथ वडनेरे,डॉ.गोपी सोरडे (जळगाव ), डॉ. राजेंद्र गोणारकर( नांदेड )यांच्यासह महाराष्ट्रातील विविध विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक ,  विद्यार्थी उपस्थित होते .

सिनेमाला प्रारंभीच्या काळात कला मानले जात नव्हते असे सांगून नांदगावकर  म्हणाले की ,1950 नंतरच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने सिनेमाला जगभर कला म्हणून मान्यता मिळाली . .सिनेमा ही यंत्राधिष्ठित असलेली एकमेव कला आहे .अमेरिकन लोकांनी सिनेमाकडे व्यवसाय म्हणून , युरोपच्या लोकांनी कला म्हणून तर भारतीय लोकांनी लोककला म्हणून पाहिले. यामुळे भारतीय लोकांचा सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन जगातील इतर देशांपेक्षा वेगळा आहे . प्रत्येक सिनेमात गाणी हा प्रकार केवळ भारतीय उपखंडात पाहायला मिळतो .

सिनेमाकडे कसे बघावे हे भारतीयांनी शिकण्याची गरज आहे आणि त्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून नांदगावकर म्हणाले की, प्रत्येक विद्यापीठ व महाविद्यालयात कॅम्पस फिल्म सोसायटी असणे गरजेचे आहे. जगातील चांगला सिनेमा कोणता ते जाणून घेऊन विद्यार्थांनी या क्षेत्राकडे शैक्षणिक दृष्टी ने पाहिले पाहिजे.

चित्रपट निर्मितीत पटकथा लेखन, चित्रीकरण आणि संकलन हे तीन महत्त्वाचे भाग असतात असे सांगून नांदगावकर म्हणाले की, माणसाच्या मनाचे परिवर्तन करण्याची शक्ती सिनेमामध्ये आहे आजच्या काळात कोविड आणि इतर कारणांमुळे सिनेमासृष्टी समोर संकट उभे राहिले असले तरी सर्व संकटांवर मात करून सिनेमा टिकून राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला .विसावे शतक हे सिनेमाचे होते या कालखंडात भारतात आणि भारताबाहेरप्रचंड सर्जनशीलता असलेले चित्रपट-दिग्दर्शक निर्माण झाले एकविसाव्या शतकामध्ये मात्र असा एकही दिग्दर्शक निर्माण झाल्याचे चित्र दिसत नाही याविषयी खंत व्यक्त करून नांदगावकर म्हणाले की आजच्या डिजिटल काळामध्ये असे नवा साठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार होत आहेत त्यामुळे असे घडत असावे असे वाटते . सहभागी प्रतिनिधीने विचारलेल्या विविध उतरण नाही नांदगावकर यांनी उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मीम संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली अध्यक्षीय भाषणात डॉ .सुधीर भटकर म्हणाले की या संघटनेतर्फे महाराष्ट्रातील माध्यमाच्या क्षेत्रातील विद्यार्थी आणि अध्यापक यांच्या साठी विविध उपक्रम राबविण्याच्या कार्यात आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत व यापुढेही प्रयत्नशील राहू. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. तेजस्विनी कांबळे व प्रा. ऋषिकेश मंडलिक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अंबादास भासके  यांनी करून दिला, आभार प्रदर्शन डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी केले. .कार्यक्रमात विद्यार्थी,शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.