औरंगाबाद शहरात तणावपूर्ण शांतता ; इंटरनेट सेवा बंद

0

दोन गटातील वादामुळे हाणामारीत २५ जण जखमी ; अनेक ठिकाणी जाळपोळ

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामुळे शुक्रवारी (11 मे) मध्यरात्री तुफान हाणामारी झाली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन गटातील वादामुळे परिसरात जाळपोळ, तुफान दगडफेक करण्यात आली. मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट आपापसात भिडले.

तलावरी, चाकू , लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. या घटनेत पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी वाहनांची, दुकांनाची तोडफोड-जाळपोळ केली. दरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला. यामध्ये एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, जमावानं केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच, शहरात 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे

—अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन —–
औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात रात्रभर झालेल्या जाळपोळ, दगडफेकीमागे नेमकी काय कारणे आहेत ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासातून सत्य काय ते समोर येईलच. पण हा वाद मोठा होण्यापासून टाळता आला असता. या भागात हिंसाचार भडकला तो अफवांमुळे. वेगवेगळया अफवा पसरल्यामुळे जमाव अधिक हिंसक झाला. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

—-जमावबंदी लागू —
औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात रात्रभर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे. हिंसाचाराचे लोण अन्यत्र पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.