ऐश्वर्या परदेशी यूजीसी नेट उत्तीर्ण

0
 पाचोरा  प्रतिनिधी
   येथील ऐश्वर्या राजेंद्रसिंग परदेशी हिने इंडियन क्लासिकल म्युझिक या विभागातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण केली असून संगीत क्षेत्रातील अशी परीक्षा उत्तीर्ण होणारी ती जळगाव जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थीनी असावी असे म्हटले जात आहे.
       कु.ऐश्वर्या ही पुणे येथून एस. एन.डी.टी  विद्यापीठातून संगीत (गायन) या विषयातून प्रथम श्रेणीत एम. ए.उत्तीर्ण असून सध्या पुणे येथील पं. सुहास व्यास यांचेकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण तर गुरू रवी दाते यांच्याकडे भावगीत व गझल गायनाचे शिक्षण घेत आहे.
    व्हॉइस ऑफ पाचोरा म्हणून परिचित असलेली ऐश्वर्या हिला राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक व खानदेश गौरव पुरस्कार प्राप्त आहे. इंदोर, कोल्हापूर व म्हैसूर येथील तिन्ही राष्ट्रीय युवा महोत्सवात ३ सुवर्णपदक पटकावणाऱ्या ऐश्वर्या हिने बॉस्टन, अमेरिका येथील बर्कली कॉलेज ऑफ म्युझिक मधील ५ दिवसीय कार्यशाळेत आपल्या गायनाची चमक दाखवली आहे.
    शास्त्रीय संगीताबरोबरच भावगीत, भक्तीगीत व सुफी गायनाचा अनोखा हातखंडा जोपासणाऱ्या ऐश्वर्या ने पाश्चात्य संगीतातही विशेष प्राविण्य मिळवले आहे. तिला गुरू गोविंद मोकाशी (पाचोरा) व पुणे येथील डॉ. शितल मोरे, डॉ. पौर्णिमा धुमाळे व मीनाक्षी बसवंत यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
      ऐश्वर्या ही पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. राजेंद्रसिंग परदेशी व येथील मिठाबाई कन्या कनिष्ठ विद्यालयातील प्रा. प्रतिभा परदेशी यांची सुकन्या आहे.
तिच्या ह्या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.