एसटी बंदच! प्रवाशांसह विद्यार्थी टांगणीला…

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मागील काही दिवसांपासून एसटी बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. तर विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करणे हे आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे येथील प्रवाशांसह  विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. मागील काही दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र बस सेवा ठप्प पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बसेस बंद असल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा सहारा घेऊन त्यातून प्रवास करावा लागत आहे, तर खाजगी वाहनधारक भरधाव वाहने चालवत असल्याने प्रवाशांना मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दिवाळीची सुट्टी संपल्यामुळे शाळा सुरू झाल्या आहेत. अशातच सहामाही परीक्षा तोंडावर आली असून काही शाळांमध्ये तोंडी परीक्षा सुरू झाल्या आहेत.

परंतु बसेस बंद असल्याने येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये -जा  करण्यासाठी विविध अडचणींना सामना करावा लागत आहे. तर खासगी वाहनाने प्रवास करणे हे गरीब विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे काही विद्यार्थी पायी, सायकलीने प्रवास करून शाळा गाठत आहेत. तर काही विद्यार्थी खासगी वाहनाने शाळेत पोहोचत आहे. बसेस बंद असल्याने काही ठिकाणी खासगी वाहनधारक हे मनमानी भाडे आकारून प्रवाशांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे पूर्ववत बसेस सुरू होण्याची प्रवाशांसह विद्यार्थी वाट पाहात आहेत.

मागील काही दिवसांपासून बस सेवा बंद असल्याने येथील बस स्थानकात शुकशुकाट पसरला आहे. तालुक्यातील काही शाळांमध्ये तोंडी परीक्षा सुरू झाल्या आहेत. परंतु बसेस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.