एसटीच नही शे गुरुजी, शाळामा इऊ कसा मी.. ?

0

रजनीकांत पाटील, जळगाव  लोकशाही न्यूज नेटवर्क  

मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू झाल्या. मात्र, दिवाळीची सुटी संपली आणि आता एसटीचा संप सुरू झाला. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्याचा शाळेत जाण्याचा मार्गच बंद झाला आहे. एसटीच नाही तर शाळेत कसं येणार गुरुजी, असं म्हणायची वेळ सध्या विद्यार्थ्यांवर आली आहे.

दरम्यान, पालकांची चिंता आणखीच वाढली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावात शैक्षणिक सुविधा नसतात. अशावेळी मोठ्या गावात किंवा शहरात जाऊन त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागते. यासाठी हक्काच्या एसटीची साथ नेहमीच पाठीशी त्यांच्या असते.

मात्र मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचा प्रश्न उभा आहे. विशेष म्हणजे काही पालक आपल्या पाल्यांना दुचाकीने शाळेत सोडत आहे. मात्र प्रत्येक पालकाजवळ वेळ तसेच वाहतुकीचे साधन नसल्यामुळे ग्रामीण विद्यार्थी घरीच राहणे पसंत करत आहेत. त्यामुळे एसटीचा संप सुटावा, अशी प्रार्थना सध्या विद्यार्थी करत आहेत.  आधीच कोरोनामुळे शिक्षणात विघ्न आणले. आता एसटीच नसल्याने शाळा सुरू होऊनही शाळेत जाताच येत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे,  अर्ध्यापेक्षा शैक्षणिक सत्र संपले आहे. त्यामुळे अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण झाला नाही. त्यातच दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होत असलेल्या चढ-उताराने सामान्य नागरिकांनी करावे तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. शाळा सुरू झाली असतानाही एसटी नसल्याने अनेकांना शाळेतच येता येत नाही. त्यामुळे घरी बसण्यापेक्षा आई-वडिलांना अनेक विद्यार्थी शेतात काम करण्यासाठी मदत करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.