(Video) उदयनराजे भाजपात आल्यास आनंदच : मुख्यमंत्री

0

भुसावळ :  खा.उदयनराजे भोसले भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल. भाजपात येण्याचा सर्वस्वी निर्णय त्यांचाच असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भुसावळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. महा जनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री कालपासून जळगाव जिल्ह्यात दाखल झालेले आहे. दरम्यान आज सकाळी भुसावळात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते आहेत. ज्यांनी जगाच्या पाठीवर भारताला एक मजबूत देश म्हणून पुढे आणले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच अनेक पक्षांचे लोक आमच्याकडे येता आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांवर जनतेचा सोडा, त्यांच्या लोकांचाच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी भाजपच्या मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करावी, असा टोला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना लगावला.

येत्या विधानसभा निवडणुकीत आमच्या महायुतीलाच जनता अभूतपर्व यश देईल. गेल्या पाच वर्षांत विरोधकांना सूरच सापडला नाही. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना केंद्रात पाठवायचे की राज्यात ठेवायचे हे पक्षश्रेष्ठी ठरवत असतात. आजही ते आमचे मोठे नेते आहेत आणि मार्गदर्शक आहेत. मी महाराष्ट्रात खूश आहे. पण, पक्ष जे सांगतील ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काही दिवसांपूर्वीत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयन राजे यांनी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली होती. दरम्यान, भाजपात जायचे की नाही हा निर्णय माझ्या मनाप्रमाणे मी घेईन, असे उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारीच म्हटले होते. आता त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उदयनराजे भोसले भाजपात आले तर आनंदच होईल मात्र निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल असे म्हटले आहे. त्यामुळे आता उदयनराजे काय निर्णय घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.