“ईव्हीएम’ छेडछाड : 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट

0

नवी दिल्ली – एक्झिट पोल्समध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना पाहून विरोधी पक्ष ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. “ईव्हीएम’मध्ये छेडछाड झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभुमीवर 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगची तातडीने भेट घेतली आणि मतमोजणीपूर्वी निवडक मतदान केंद्रांमधील “व्हीव्हीपॅट’मधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी केली. या पडताळणीमध्ये काही तफावत अढळल्यास “व्हीव्हीपॅट’ पावत्यांची 100 टक्के पडताळणी करण्यात यावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे, अशी माहिती कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना सांगितले.

“ईव्हीएम’च्या सुरक्षितेबाबत विरोधकांनी महिन्याभरापासून निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र आता बुधवारी यासंदर्भात निवडणूक आयोग बैठक घेणार आहे, असे कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर “ईव्हीएम’मध्ये गडबड झाली असल्याचा आरोप बसपा नेते सतिश चंद्र मिश्रा यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात केंद्रीय दले तैनात करण्याची मागणीही त्यांनी केली. “ईव्हीएम’च्या वाहतुकीदरम्यानच्या सुरक्षिततेबाबतही विरोधकांनी शंका उपस्थित केली.

उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब अशा विविध भागांमधून “ईव्हीएम’बाबत छेडछाडीच्या तक्रारी येत आहेत. ही “ईव्हीएम’ राखीव असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तरीही ही “ईव्हीएम’ उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखवली गेली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्‍ते राजीव शुक्‍ला यांनी केली. या संशयास्पद हालचालींवर निवडणूक आयोगाने त्वरित हालचाली कराव्यात आणि देशातील सर्व स्ट्रॉंगरूममधील “ईव्हीएम’च्या सुरक्षिततेबाबत सर्व शंकांचे निरसन करावे, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केले.

भाजपने मात्र या अक्षेपांवरून निवडणूक आयोगाच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल विरोधी पक्षांवरच जोरदार टीका केली. एक्‍झिट पोलच्या निष्कर्शामुळे देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील “एनडीए’चे सरकार येण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळेच भाजपच्या विरोधकांना भीती वाटू लागली आहे. ममता बॅनर्जी, एन. चंद्रबाबू नायडू, अमरिंदर सिंग आणि अरविंद केजरीवाल यांनी निवडणूका जिंकून ते सत्तेत आले. मात्र जेंव्हा मोदी पुन्हा सत्तेत येण्याची शक्‍यता दिसायला लागली, तेंव्हा मात्र या नेत्यांना विश्‍वास ठेवता येत नाही आहे, अशी टीका भाजप नेते आणि कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.