आहेर देणार नाही, आहेर घेणार नाही..
सांगोरे व नायदे परिवाराची प्रथा मोडीत कुटुंबांनी घेतलेला पुढाकार…

0

शिरूड ता अमळनेर – नुकताच चोपडा जिल्हा जळगाव येथील पद्म मोहन मंगल कार्यालय येथे सांगोरे व नायदे परिवाराचा मनोमिलन विवाह सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत नियंत्रित वातावरणात व शिस्तबद्ध रीतीने सर्व सगेसोयरे यांनी उपस्थिती दिली.
अमळनेर येथील श्री डी ए धनगर यांची मुलगी जिज्ञासा व चोपडा वर्डी येथील श्री योगराज माधवराव नायदे व योगिता बाविस्कर यांचा मुलगा प्रफुल्ल यांचा विवाह झाला.
या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबांनी प्रचलित चालीरीतींना फाटा देत कालसुसंगत विवाह घडवून आणला. वर्डी ता चोपडा व शिरुड ता अमळनेर येथील नायदे व सांगोरे परीवाराने आहेर पद्धतीला फाटा देऊन अनोखा आदर्श ठेवला. या दोन्ही कुटुंबांनी कोणत्याही प्रकारचा आहेर दिला नाही अथवा स्वतः स्वीकारला नाही. आहेर देणार नाही, आहेर घेणार नाही. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी निश्चित पणाने ही प्रथा मोडीत काढण्यासाठी या कुटुंबांनी घेतलेला पुढाकार निश्चित प्रेरणादायी आहे. कारण बऱ्याचदा दिलेला आहेर आपण वापरतोच असे नसते. किंबहुना एकीकडचा आलेला आहेर दुसरीकडे चालवला जातो. हा सर्व खो खो चा खेळ सुरू असतो. आहेर घेण्यासाठी खर्च करावाच लागतो. मात्र एखाद्या कुटुंबाला हा आहेर घेणे परवडत नाही प्रसंगी तो कर्ज काढून, लोक काय म्हणतील या भीतीने आहेर देत असतो. म्हणून या कुटुंबांनी घेतलेला आहेर प्रथा बंद करण्याचा पुढाकार अभिनंदनास पात्र आहे. कारण या कुटुंबातील सदस्यांनी आहेर प्रथेला फाटा दिला.
तसेच या लग्नसमारंभात एकाच वेळी दोन्ही परिवारांनी कोणत्याही प्रकारची भेटीसाठी यादी ठेवली नाही. अशी कदाचित पहिलीच वेळ असावी. तसेच जेवताना ताटाला पैसे लावले जातात त्याला आपल्या अहिराणी भाषेत अळखण असे म्हणतात. नवरदेव, नवरी किंवा जावई, मेहुणे यांच्या ताटाला नारळ अथवा पैसे लावण्याची एक प्रथा आहे. या प्रथेला सुद्धा तिलांजली दिली. खरोखर या दोन्ही सुशिक्षित कुटुंबांनी समाजपरिवर्तनासाठी घरापासून सुरुवात केली आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आचरण केले आहे. म्हणून त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिज्ञासा व प्रफुल्ल यांच्या वैवाहिक जीवनासाठी सुख-समृद्धी भरभराट व आरोग्यदायी जाण्यासाठी शुभेच्छा समाजातील अनेक मान्यवर देत आहेत. उदयोन्मुख काळात यांच्या हातून सुद्धा असंच समाजाभिमुख कार्य घडो अशा सदिच्छा साने गुरुजी परीवाराने दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.