अटींचा भंग करणार्‍या सहा वाळू गटाच्या कंत्राटदारांची बँक गॅरंटी जप्त; एकाला दंड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वाळू उत्खनन करतांना करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग करणार्‍या सहा वाळू गटाच्या कंत्राटदारांची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली असून यातील एका कंत्राटदाराला दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

 

जिल्ह्यातील सात वाळू गटांची अपर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने तपासणी केली होती. त्यात करारनाम्यातील अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्याबाबत लिलावधारकांनी खुलासे सादर केले होते. ते अमान्य करण्यात आले आहेत. या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी सहा लिलावधारकांची वाळू गटाच्या अपसेट प्राइसच्या २ टक्के असलेली बँक गॅरंटीची रक्कम जप्त केली.

याच्या अंतर्गत बांभोरी प्र.चा.चे लिलावधारक पटेल ट्रेडींग कंपनी यांची २ लाख ८ हजार ३९६ रुपयांची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली. नारणे वाळू गटाचे लिलावधारक सुनंदाई बिल्डर्स ऍन्ड डेव्हलपर्स यांची ३ लाख ४२ हजार २० रुपये, टाकरखेडा वाळू गटाचे लिलावधारक व्ही. के. इंटरप्रायजेस यांची १ लाख २२ हजार ४२२, वैजनाथ वाळू गटाचे लिलावधारक श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांची १ लाख १८ हजार, उत्राण गट क्रमांक नऊचे लिलावधारक एम.एस. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांची ५ लाख ४ हजार ६ रुपये आणि उत्राण गट क्रमांक १७चे लिलावधारक महेश सदाशिव माळी (रा. पाचोरा) यांची २ लाख ५१ हजार ६६० रुपयांची बँक गॅरंटीची रक्कम जिल्हा प्रशासनाने जप्त केली आहे.

 

दरम्यान, या आधी वैजनाथ वाळू गटातून अवैध उत्खनन केल्याप्रकरणी ऍड. विजय पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्या समितीने वाळू गटाची मोजणी केली होती. वैजनाथ गटामधून ३३४ ब्रास अवैध वाळू उत्खनन केल्याचे आढळले होते. मात्र, तक्रारदारासह लिलावधारकाने ती मोजणी अमान्य केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजणीबाबत अहवाल मागवला. त्या अहवालानुसार वैजनाथ वाळू गटातून अवैध उत्खनन प्रकरणी लिलावधारक श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांना सुमारे ७० ते ८० लाख रुपयापर्यंत पाचपट दंडाची नोटीस बजावली आहे. तसेच आव्हाणी वाळू गटाच्या लिलावधारकालाही अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.