आता मात्र गुन्हेगारांची खैर नाही- पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील कांचन नगर भागात पूर्व वैमनस्यातून थेट घरात घुसुन गोळीबाराची घटना घडल्यानंतर रात्री उशीरा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांनी येथे भेट दिली. तसेच या पाश्वभूमीवर विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली.

जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. मागील काही दिवसांपासून वारंवार गोळीबार, खून, चोरी अशा अनेक घटना समोर येतांना दिसत आहे. या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी  आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांच्या उपस्थित पत्रकार परिषदेचे आयोजन  करण्यात आले. याप्रसंगी पोलीस महानिरिक्षक म्हणाले की, या गोळीबारात अवैध प्रकारचे कट्टे वापरले जात असून यांच्या तपाससाठी, तसेच हे कट्टे कशाप्रकारे जप्त केले जातील, आणि यावर कठोर कारवाई कशा प्रकारे केली जाईल यासाठी पोलीस खात्याची विशेष टीम काम करत असून या भूमिकेपर्यंत आम्ही पोहचले आहे.  याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. याचे चांगले रिझल्ट आपल्याला काही दिवसात पाहायला मिळतील.

तसेच  फसवणूक, ब्लॅकमेलींग, खुनाचा प्रयत्न किंवा खून अशा प्रकारच्या गुन्ह्यातील पाच वर्षातील जितके आरोपी असतील त्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम सुरु केलेले आहे. त्यांच्यावर पूर्वी केलेल्या गुन्ह्यावरील प्रतिबंधात्मक कारवाया असतील किंवा आता सध्या ज्या कारवाया करतील त्या कठोर कारवाया केल्या जातील. आता मात्र गुन्हेगारांची खैर नाही. सज्जनाला सलाम आणि दुर्जनांवरती प्रहार पोलीस खातं सुरु करणार आहे. यापूर्वी देखील चांगल्या कामगिरी झाल्या आहेत, परंतु सर्वात जास्त इफेक्टिव्ह आणि गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या कारवाया केल्या जातील. असे देखील पोलीस महानिरिक्षक यांनी सांगितले.

याचबरोबर गुन्हेगारांचा पाच वर्षांचा बायोडाटाच नाही तर मुख्य आरोपी कुठे आहेत त्यांचा तपास करून त्यांना पकडण्याचे काम रात्रीपासूनच सुरु झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी काल रात्री छापेमारी देखील करण्यात आली. हे काम सुरूच राहणार आहे, जोपर्यंत आम्हाला गुन्हेगारांचा छडा लागत नाही. तसेच अवैध सावकारी वर देखील वचक ठेवण्यात येणार आहे. यावेळी पोलीस महानिरिक्षक शेखर यांनी जनतेला देखील आवाहन केले आहे की, गुन्हेगारींवर आळा बसण्यासाठी लोकांनी देखील पुढे येवून याविषयी माहिती देत पोलीस खात्याला मदत करावी.

या पत्रकार परिषदेवेळी  जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे,  सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांची उपस्थिती होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.