आग लागली की लावली? वनखात्याने तात्काळ चौकशी करावी : कदम

0

मुंबई : गोरेगावमधील आरे कॉलनीमधल्या जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरुवात झाली आहे. कारण खुद्द राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीच याबाबत संशय व्यक्त केला आहे. आरे जंगलाला आग लागली की लावली याबाबत वनविभागाने तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. तसंच या आगीसंदर्भात आपण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं.
आरे कॉलनीतील जंगलाला सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता लागलेली भीषण आग तब्बल सहा तासांनी आटोक्यात आली आहे. अग्निशनम दलाच्या जवळपास 100 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री साडेबाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवलं. डोंगराळ भाग असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी पायी जाऊन आग विझवली.
मात्र या आगीमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप वनशक्ती या संस्थेने केला आहे. आरे कॉलनीतील जमीन मिळवण्यासाठी जाणूनबुजून ही आग लावल्याचा आरोप होत आहे. दरम्यान या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश दिल्याचं सहाय्यक मनपा आयुक्त संजोग कबरे यांनी सांगितलं. आरोपांमध्ये तथ्य असेल तर दोषींविरोधात कारवाई केली जाईल, असं शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.