आगळेवेगळे गणपतीचे श्रद्धास्थान: पद्मालय

0

पंकज महाजन, एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

आगळेवेगळे असे गणपतीचे श्रद्धास्थान असलेले श्री. क्षेत्र पद्मालय हे डोंगर माथ्यावर वसलेले असून येथून दोन किलोमीटर अंतरावर भीमकुंड म्हणून ठिकाण आहे. त्याठिकाणी बकासुर नावाच्या राक्षसाला भिमाने ठार केल्याची आख्यायिका आहे. श्री क्षेत्र हे साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून ओळखले जाते.

जगात कोणत्याही गणपती मंदिरात गेल्यास एकच मूर्ती पाहावयास मिळते. श्री क्षेत्र पद्मालय येथे एका सिंहासनावर  गणरायाच्या दोन मुर्त्या दृष्टीस पडतात, त्यात एक मूर्ती उजव्या सोंडेची व दुसरी मूर्ती डाव्या सोंडेची श्रीगणेश पुराणातील उपासना खंडातील ७३,७४,९०,९१, या अध्यायात श्री क्षेत्र पद्मालय संस्थानातील स्वयंभू श्री गजानन मूर्तींचा उल्लेख आढळतो.

का‌र्तविर्यानेत्याला उजव्या सोंडेच्या स्वरूपाने “श्री” नी दर्शन दिले व शेष नागाला शंकर भगवंतांनी टाकून दिले होते.  शंकरांनी पुन्हा त्याला गळ्यात धारण करावे यासाठी शेषने “श्रींची” तपश्चर्या केली त्याला डाव्या सोंडेच्या स्वरूपात श्रींनी  तलावातून दर्शन दिले अशी आख्यायिका आहे. पद्मालय येथील तलावात निळ्या रंगाची कमळाची फुले येतात यावरून या क्षेत्राला पद्मालय असे नाव पडले आहे.

  मनोहारी मंदिर

श्री क्षेत्र पद्मालय येथील गणपती मंदिराची रचना हेमाडपंती असून बनारस येथील काशी विश्वेश्वराच्या जुन्या मंदिराची प्रतिकृती असल्याचे सांगितले जाते.  गोविंद महाराजांनी १८३५ मध्ये हे देवालय बांधले आहे.  देवालयात समोर मोठा सभामंडप असून प्रवेश करताना साडेचार फुट उंचीचा दगडाचा एक मोठा उंदीर पाहण्यास मिळतो.  देवालयासमोर मोठा दगडी गाठ बांधला आहे.  त्या ठिकाणी एक मोठी पंचधातू मिश्रित अशी सुमारे अकरा मनाची घंटा बांधण्यात आली आहे.  समोर तलाव असून सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात या ठिकाणी कमळाची फुले उमलतात.

पावसाळ्यात पद्मालय परिसरात सर्वत्र निसर्गरम्य वातावरण पाहावयास मिळते.  सृष्टि सौंदर्याने नटलेल्या या तीर्थक्षेत्रावर श्री गणरायाचे दर्शन घेण्याचा आनंद व समाधान आगळे वेगळे असते.  म्हणून पद्मालय क्षेत्र हे भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. पद्मालय देवालयाचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन विश्वस्त ऍडव्होकेट आनंदराव पाटील, विश्वस्त ए. एल. पाटील, विश्वस्त अमित पाटील व त्यांचे सहकारी भाविकांसाठी विविध सोयी सुविधा पुरविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येतात.

जळगाव व एरंडोल येथून पद्मालय येथे जाण्यासाठी बस सेवा सुरू आहे. गणेश जयंती निमित्ताने पद्मालय येथे भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतील असे सांगण्यात आले.  या दिवशी कासोदा तळई पाळधी येथील पायी दिंड्या येतात व दिंड्यामधील आलेले भाविक गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गणराया पुढे मनोभावे नतमस्तक होतात.

कार्तिक पौर्णिमा श्रावण सोमवार अंगारकीला येथे प्रचंड यात्रा उत्सव भरतो.  वैशाख पौर्णिमा भाद्रपद शुक्ल  ४ व माग शुक्ल ४ या दिवशी येथे उत्सव असतो,  शके १६९० मध्ये श्रीमंत माधवराव पेशवे यांनी या संस्थानास पूजा अर्चासाठी सनद दिलेली आहे.  पुढे इंग्रज राजवटीत तिला मान्यता देण्यात आली.  नंतर भारत सरकारने ती ग्राह्य धरून देवस्थानास वर्षासन देऊ केलेले आहे.

श्री क्षेत्र पद्मालय हे जागृत देवस्थान असूनही या परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून अजूनही विकास झालेला नाही.  अलीकडच्या काळात नवनवीन तीर्थक्षेत्री उदयाला आली व त्या क्षेत्रांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास झाला.  पण श्री क्षेत्र पद्मालयचे पर्यटन स्थळ होण्याबाबत अजूनही अपेक्षा कायम आहेत.  दरम्यान जोपर्यंत या परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होत नाही.  तोपर्यंत श्री क्षेत्र पद्मालय हे नवस मानण्याचे व नवस फेडण्याचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.  तसेच निवडणुका लागल्या की प्रचाराचा नारळ फोडण्याचे केंद्र झाले आहे.

दरम्यान कोरोना सदृश्य स्थिती असल्याने मंदिर बंद असुन भाविक सध्या दर्शना वाचुन वंचित राहत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मंदिर उघडे व्हावे, अशी मागणी भाविक करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.