अस्वच्छतेच्या गर्तेत सत्ताधार्‍यांकडून विकासकामाचे उद्घाटन!

0

उद्घाटनांची लगीनघाई…

 

जळगाव दि. 9 –
लोकसभा निवडणुकीमुळे लागू होणार्‍या आचारसंहितेमुळे दिल्ली ते गल्लीतील भाजप पदाधिकार्‍यांनी विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावला आहे. शुक्रवारीच रिंगरोडवरील क्रॉसबारचे भुमिपूजन झाले. याबाबत सत्ताधार्‍यांकडून करण्यात आलेले फोटोसेशनही विविध प्रसारमाध्यमांत आले. मात्र उद्घाटनाच्या लगीनघाईत सत्ताधार्‍यांना परिसर स्वच्छतेचेही भान राहिले नसल्याचे लक्षात येते. या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचेही बारा वाजवले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त लागू होणार्‍या आचारसंहितेमुळे भांबावलेल्या सत्ताधार्‍यांनी ममुराबाद रस्त्यावरील पुल तोडला. त्यानंतर शिवाजी नगर पुलाच्या कामाचे उद्घाटन लवकरात लवकर आटोपून रेल्वेला पुल तोडण्यास भाग पाडले. गेल्या सहा महिन्यापुर्वी झालेल्या महासभेत खुद्द उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्यासह नगरसेविकांनी रिंगरोडवरील अवजड वाहतुकीचा मुद्दा उपस्थित करुन क्रॉस बार लावण्याचा ठराव पारीत केला होता. हे राहून गेलेले काम आचारसंहितेपुर्वीच आठवल्यामुळे घाईत उद्घाटन आटोपले. मात्र परिसर स्वच्छतेची शासन व प्रशासनाला आवश्यकता वाटलेली नाही. सदर भुमिपूजन बोर्डाला लागूनच शाहू नगरकडून वाहत येणारा नाला आहे. बोर्डाच्या शेजारीच असलेला हा नाल्यातील उकिरडा शासन आणि प्रशासनाला दिसला नाही काय? सदरच्या नाल्यात इतका कचरा साठला आहे की, एक माणूस त्या कचर्‍यातून सहज चालत जावून नाला पार करु शकतो. शाहू नगरकडून वाहत आलेला हा नाला रिंगरोड व रेल्वे लाईनला समांतर असलेला रस्ता क्रॉस करुन रेल्वेलाइनला समांतर पिंप्राळ्याकडे जातो. रिंगरोड क्रॉस झाल्यावर उघड्या नाल्याचा उकिरडा झाला आहे. नाल्यातील कचर्‍यातून पाणी झिरपत पाईपाद्वारे जाते. तर गेली अनेक वर्षे नालासफाई झाल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. क्रॉसबारचा ठराव पारीत होवून सहा महिने झाले. त्यानंतर भुमिपूजन झाले त्यानंतर प्रत्यक्ष कामाला आचारसंहिता संपल्यावरच होईल अशी चिन्ह आहे, तेव्हाच नाल्याची सफाई करण्यात येणार आहे काय? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.